इथेनॉल मिश्रणाचा 'झोल'! पेट्रोलच्या नावाखाली ग्राहकांची उघड लूट; प्रति लिटर ७ रुपयांचा भुर्दंड
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
वाहनांचे प्रदूषण कमी करणे आणि कच्च्या तेलाची आयात घटवणे या उदात्त हेतूने सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण सक्तीचे केले खरे, मात्र याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या किमतींमधील फरकाचा फायदा ग्राहकांना देण्याऐवजी, सरकार आणि तेल कंपन्या मिळून ग्राहकांकडून शुद्ध पेट्रोलचेच दर वसूल करत आहेत. या 'इथेनॉल गणितातून' ग्राहकांची प्रति ५ लिटरमागे तब्बल ३७ रुपयांची उघड लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या बाजारात पेट्रोलचा दर ११२ रुपये प्रति लिटर आहे, तर इथेनॉलची किंमत केवळ ७५ रुपये प्रति लिटर आहे. नियमानुसार, तुम्ही विकत घेत असलेल्या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळलेले असते. म्हणजेच, जेव्हा एखादा सामान्य नागरिक ५ लिटर 'पेट्रोल' खरेदी करतो, तेव्हा प्रत्यक्षात त्याला ४ लिटर शुद्ध पेट्रोल (किंमत ११२ प्रमाणे = ४४८ रुपये), १ लिटर इथेनॉल (किंमत: ७५ रुपये) एकूण खरी किंमत५२३ रुपये परंतु, पेट्रोल पंपावर ५ लिटर पेट्रोलसाठी ग्राहकाकडून पूर्ण ११२ रुपयांच्या दराने ५६० रुपये उकळले जातात. म्हणजेच, प्रत्येक ५ लिटरमागे ग्राहकाला ३७ रुपये अतिरिक्त (जास्तीचे) मोजावे लागत आहेत. प्रति लिटरमागे होणारी फसवणूक सुमारे ७.४० रुपये इतकी आहे.
इथेनॉल हे उसाच्या मळीपासून आणि धान्यापासून भारतातच तयार केले जाते. ते स्वस्त असल्याने पेट्रोलचे दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळेल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात स्वस्त इथेनॉलचे दर महागड्या पेट्रोलच्या बरोबरीने लावून सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या आपला नफा वाढवत आहेत. २५ ते ३० टक्क्यांनी मायलेज कमी देणाऱ्या इथेनॉलसाठी ग्राहक पेट्रोलचा पूर्ण दर का मोजणार? असा संतप्त सवाल आता वाहनधारक विचारत आहेत.
"हा सरळ सरळ ग्राहकांच्या पाकिटावर दरोडा आहे," अशा भावना सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत. सरकारने जर २०% इथेनॉल मिश्रण सक्तीचे केले आहे, तर पेट्रोलचे दर प्रति लिटर किमान ७ ते ८ रुपयांनी कमी झाले पाहिजेत. हरित इंधनाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल थांबवून, सरकारने या लुटीचा जाब द्यावा आणि तातडीने किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.