घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांत २ लाख ३५ हजारांचे दागिने आणि रोकड लांबवली
ब्रम्हपुरी परिसरात चोरांचा धुमाकूळ
ब्रम्हपुरी:
एकाच दिवशी आणि अगदी आसपासच्या वेळात घरफोडीच्या दोन मोठ्या घटना समोर आल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. या दोन्ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडल्या असून, याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रुई ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी सुरेश गणपत बुल्ले (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी उत्तरा आणि मुलगी चिनेश्वरी शेतात गेल्या होत्या. नातू शेजारी गेला होता. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरेश बुल्ले यांनी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले आणि नेहमीच्या ठिकाणी चावी ठेवून बसस्टॉपवरील आपल्या पानठेल्यावर चहा-खर्रा विकण्यासाठी निघून गेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते घरी परतले तेव्हा पत्नी आणि मुलगी घरी हजर होत्या. पत्नीने त्यांना सांगितले की, "आम्ही दुपारी १२:३० वाजता घरी आलो तेव्हा कुलूप खाली पडलेले होते. आज तुम्ही कुलूप लावले नव्हते का?" सुरेश यांनी कुलूप उचलून पाहिले असता ते तोडलेले आढळले. संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. घरातील लोखंडी अलमारीचा दरवाजा उघडा होता आणि आतील लॉकर तोडलेले होते. लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब होती.
चोरीला गेलेला ऐवज यामध्ये १० ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत अंदाजे ५०,००० रुपये, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत अंदाजे २५,००० रुपये, ४.५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन नथ किंमत अंदाजे २०,००० रुपये, ३ ग्रॅमच्या कानातील बिंर्या किंमत अंदाजे १०,००० रुपये, ५ तोळ्यांचे चांदीचे चाळ किंमत अंदाजे १०,००० रुपये, रोख रक्कम २०,००० रुपये असा एकूण ऐवज १,३५,००० रुपये चा लंपास केला.
दुसरी घटना हळदा (ता. ब्रम्हपुरी) येथे घडली. येथील ज्ञानगंगा विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले वामन मोतीराम कोटगले (वय ५६) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांची पत्नी मालता आणि मुलगा प्रतिक हे कामानिमित्त ब्रम्हपुरीला गेले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता वामन कोटगले हे घराला कुलूप लावून शाळेत गेले. दुपारी २:२५ वाजताच्या सुमारास ते पाणी पिण्यासाठी घरी आले असता त्यांना मुख्य दरवाजाला दांडा लावलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता हॉलमधील सोफ्यावर तोडलेले कुलूप ठेवलेले आढळले. बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता अलमारी उघडी होती आणि आतील लॉकर तोडलेले होते. धान विक्री करून आलेले १ लाख रुपये त्यांनी मुलाला लॅपटॉप घेऊन देण्यासाठी अलमारीत ठेवले होते. ते सगळे पैसे चोरट्याने लांबवले होते.
या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी घरचे लोक बाहेर गेल्याची संधी साधून कुलूप तोडले आणि घरफोडी केली. सुरेश बुल्ले आणि वामन कोटगले यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) अन्वये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.