विजेची बचत काळाची गरज; विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती
- महावितरणच्या शहर विभागातर्फे अभियंता दिनानिमित्त नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
ब्रह्मपुरी :
स्थानिक नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे महावितरण कार्यालयाच्या शहर विभागातर्फे अभियंता दिनाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा व वीज बचत या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, विजेचा सुरक्षित वापर करण्याच्या सवयी रुजविणे तसेच वीज बचतीचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. डिकेश्वर राऊत सर व श्री. शंकरपुरकर सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रधान तंत्रज्ञ श्री. शिरीष राऊत, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. विजय दिवटे तसेच वरिष्ठ यंत्रचालक श्री. छत्रपती हुलके तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री नाकाडे सर ,पर्यवेक्षक श्री जिभकाटे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. विजय दिवटे यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तुटलेल्या किंवा जमिनीवर पडलेल्या विद्युत तारांना हात लावू नये, विद्युत खांबांवर चढू नये तसेच खांबांच्या जवळ खेळू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. विजेच्या उपकरणांचा वापर करताना निष्काळजीपणा टाळावा आणि विद्युत धोक्याची परिस्थिती दिसल्यास मोठ्यांना किंवा संबंधित यंत्रणेला त्वरित कळवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर सहाय्यक अभियंता श्री. डिकेश्वर राऊत यांनी वीज वापरताना घ्यावयाची काळजी आणि विजेची बचत करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात वीज अत्यंत आवश्यक असली, तरी तिचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. वीज ही मौल्यवान ऊर्जा असून तिचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
सहाय्यक अभियंता श्री. शंकरपुरकर सर यांनी वीज बचतीसाठी करता येणाऱ्या सोप्या उपायांवर सखोल मार्गदर्शन केले. अनावश्यक दिवे व विद्युत उपकरणे बंद ठेवणे, गरजेनुसारच वीज वापरणे आणि ऊर्जाबचतीच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारणे, अशा उपायांद्वारे वीज बचत शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी श्री. छत्रपती हुलके यांनी सौरऊर्जा आणि सोलर योजनेविषयी माहिती दिली. पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा बचतीला चालना देणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांनी आधुनिक जीवनात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. शिक्षण, उद्योग, दळणवळण आणि दैनंदिन जीवनातील अनेक कामे विजेवर अवलंबून आहेत. त्यामुळे विजेचा काटकसरीने व सुरक्षितपणे वापर करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत आणि आपल्या कुटुंबात तसेच समाजातही वीज बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किसान सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सातपुते मॅडम यांनी केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे नियम, वीज बचतीचे महत्त्व आणि सौरऊर्जेच्या वापराबाबत उपयुक्त माहिती मिळाली. “विजेची बचत करा, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षिततेचा संदेश द्या,” हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.