ब्रम्हपुरी पोलिसांची धडक कारवाई: आंतरजिल्हा चोरट्या टोळीचा पर्दाफाश, ३ गुन्हे उघडकीस!

   

ब्रम्हपुरी:
            स्थानिक गुन्हे शोध पथकाने (DB Team) अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावत एका आंतरजिल्हा चोरट्या टोळीतील सराईत विधीसंघर्ष बालकांना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ब्रम्हपुरीतील एका धाडसी घरफोडीसह चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
           घटनेची सविस्तर माहिती अशी की, पटेलनगर ब्रम्हपुरी येथील रहिवासी आणि उपहारगृह व्यावसायिक विरल मुकेश हलवादीया (वय ३२ वर्षे) यांचे सावरकर चौक येथे स्विटमार्टचे दुकान आहे. दि. १४ जुलै २०२६ च्या रात्री १०:०० वाजता ते दि. १५ जुलै २०२६ च्या सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान, अज्ञात चोरांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील ६ ते ७ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी विरल हलवादीया यांच्या फिर्यादीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६६/२०२६ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. (BNS) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
          गुन्हा दाखल होताच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाने तातडीने तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी आणि चोरी गेलेल्या मालाचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला. या दरम्यान, पथकाला खात्रीशीर बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यात सामील असलेले तीन विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन बालक) हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिन्ही बालकांना ताब्यात घेतले.
         ताब्यात घेतलेल्या बालकांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्यांनी ब्रम्हपुरीतील स्विटमार्टच्या दुकानफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली रोख रक्कम हस्तगत केली.
एवढेच नव्हे तर, अधिक तपासादरम्यान या टोळीतील एका बालकाने चंद्रपूर शहरातून दोन दुचाकी वाहने चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण ९०,०००/- रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. यात १) निळ्या रंगाची मोपेड (किंमत अंदाजे ४०,०००/- रुपये) क्रमांक MH 34 CB 7225 (इंजिन नं. AF212806463, चेचीस नं. MB8DP12DEN8B72981) तर २) काळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (किंमत अंदाजे ५०,०००/- रुपये) क्रमांक MH 31 DN 7912 (इंजिन नं. HA10EHB9A23997, चेचीस नं. MBL.HA10ADB9A18473) यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यासोबतच रामनगर पोलीस ठाणे (चंद्रपूर) अंतर्गत दाखल असलेले दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
          सदर उल्लेखनीय व धडक कामगिरी मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) दिनकर ठोसरे सर, आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकाचे (DB Team) सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ठ रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान आणि स्वप्नील पळसपगार यांनी या यशस्वी कारवाईत मोलाची भूमिका बजावली. ब्रम्हपुरी पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  Post Views:   1129


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी