एसबीआय बँकेतून काढलेले ३ लाख ३० हजारांची रोकड असलेली पिशवी डिक्कीतून लांबवली

   

ब्रम्हपुरी :
            शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ग्रंथालयाचे ३ लाख ३० हजार रुपये काढून मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवणं एका ग्रंथपालाला चांगलंच महागात पडलं आहे. चक्कीवर दळण आणण्यासाठी गेलेल्या ग्रंथपालाच्या मोटार सायकलची डिक्की उघडून अज्ञात महिला चोरांनी तब्बल ३ लाख ३० हजारांची रोकड पळवून नेल्याची थरारक घटना काल दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२६ उघडकीस आली आहे. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे.
            पोलिसांत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, लोकमान्य टिळक वाचनालयाचे ग्रंथपाल चंद्रभान नत्थुजी पानसे (वय ५७, रा. टिळकनगर, ब्रम्हपुरी) हे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सहकारी राजेश रविंद्र देऊळकर यांच्यासह होंडा पेन्शन प्रो मोटार सायकलने (क्र. एमएच ३४ एएम ०६३८) एसबीआय बँक शाखा ब्रम्हपुरी येथे गेले होते. त्यांनी बँकेतून एकूण ३ लाख ७० हजार रुपये काढले. त्यापैकी ४० हजार रुपये खिशात ठेवले आणि उरलेले ३ लाख ३० हजार रुपये एका कापडी पिशवीत ठेवून सहकाऱ्याच्या हातात दिले. त्यानंतर ग्रंथपालांनी ती पिशवी मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते घराकडे निघाल्यानंतर, वडसा रोड हायवेवरील 'दलाल आटा चक्की' जवळ मोटार सायकल उभी करून चक्कीच्या आत गेले. अवघ्या पाच मिनिटांत (सकाळी ११:१० वाजता) ते दळणाची पिशवी घेऊन बाहेर आले आणि मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवू लागले, तेव्हा त्यांना डिक्कीतील पैशांची पिशवी गायब असल्याचे आढळले.
         पैशांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रंथपालांनी तातडीने बाजूच्या ऑटो गॅरेजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहताना एक थक्क करणारा प्रकार समोर आला. चंद्रभान पानसे हे चक्कीच्या आत गेल्याची संधी साधून, पांढऱ्या रंगाची ओढणी व सलवार घातलेली अंदाजे २५ वर्षे वयाची एक अज्ञात तरुणी मोटार सायकलजवळ आली तिने डिक्कीतून पैशाची पिशवी लांबवली. ती पिशवी घेऊन ती तत्काळ वडसा रोडच्या दिशेने उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 'स्विफ्ट डिझायर' कारमध्ये बसून पसार झाली. तिच्या पाठोपाठ साडी घातलेली अंदाजे ३० वर्षे वयाची आणखी एक महिलाही त्याच कारमध्ये बसली आणि गाडी वेगाने वडसा मार्गाकडे निघून गेली.
           दिवसाढवळ्या घडलेल्या या फिल्मी स्टाईल चोरीच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बँक परिसर किंवा बँकेपासूनच या भामट्या महिलांचा पाठलाग सुरू असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुसाट पसार झालेल्या 'स्विफ्ट डिझायर' कारचा आणि दोन्ही संशयित महिलांचा शोध घेण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे.

  Post Views:   1625


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी