त्या तरुण वेल्डिंग कामगाराची मृत्यूशी झुंज अपयशी!

   

ब्रम्हपुरी:
         "मी पाहून घेतो," या मालकाच्या एका अहंकारी वाक्याने अखेर एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. ब्रम्हपुरी येथील 'सुलभा लॉन रेस्टॉरंट'च्या बांधकामावर विद्युत धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या विशाल गोपाल सेलोटे या २१ वर्षीय तरुणाचा काल, १२ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका हसतखेळत्या कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
        ब्रम्हपुरी येथील टोल नाक्यासमोर भीमराव चंदनखेडे यांच्या मालकीच्या 'सुलभा लॉन रेस्टॉरंट'चे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी विशाल सेलोटे स्टील वेल्डिंगचे काम करत होता. बांधकामाच्या अगदी जवळून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली होती. विशालने कामाला सुरुवात करण्यापूर्वी अनेकदा मालक चंदनखेडे यांना या धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र, "महावितरणला मी पाहून घेतो, तू तुझे काम कर," असे म्हणत मालकाने विशालला धोक्याच्या छायेत काम करण्यास भाग पाडले. २० मार्च २०२६ रोजी सकाळी काम करत असताना विशालला या उच्च दाबाच्या वाहिनीचा भीषण धक्का लागला. या अपघातात विशालची छाती, दोन्ही हात आणि पाय गंभीररीत्या भाजले गेले.
          अपघातानंतर विशालला नागपूर आणि नंतर चंद्रपूर येथे हलवण्यात आले. सुरुवातीला मदतीचे गाजर दाखवणाऱ्या मालक भीमराव चंदनखेडे याने १५ दिवस उलटूनही कोणतीही आर्थिक मदत केली नाही. "माणुसकीच्या नात्याने साधी विचारपूसही मालकाने केली नाही," असा आरोप विशालच्या वडिलांनी केला आहे. एकीकडे मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे उपचाराचा खर्च पेलताना सेलोटे कुटुंबाची मोठी ओढाताण झाली.
             विशालच्या मृत्यूची बातमी धडकताच ब्रम्हपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कष्टाळू आणि तरुण मुलगा केवळ मालकाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावून बसला, ही भावना स्थानिकांमध्ये तीव्र आहे. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता विशालच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात कडक कलमे वाढवून आरोपी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

  Post Views:   965




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी