'आम्हाला आधी विद्यार्थ्यांना शिकवू द्या!' – अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधात ब्रह्मपुरीत शिक्षक संघटनांचा तीव्र एल्गार; १००% शाळा बंद आंदोलन यशस्वी

   

ब्रह्मपुरी:
            "शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे, शिक्षकांमुळेच देशाच्या भावी पिढ्या घडतात. परंतु, आज याच शिक्षकांवर 'आम्हाला आधी विद्यार्थ्यांना शिकवू द्या' अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे," अशा संतप्त भावना व्यक्त करत ब्रह्मपुरी तालुक्यातील शिक्षक संघटनांनी सरकारी धोरणांवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. शासनाचे जाचक नियम, प्रशासनाचे तुघलकी निर्णय आणि अशैक्षणिक कामांच्या प्रचंड ओझ्याविरोधात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत ब्रह्मपुरी तालुका प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने १०० टक्के 'शाळा बंद' आंदोलन पुकारून प्रशासनाला हादरवून सोडले.
         शिक्षकांचे मूळ काम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे असताना, शासनाने शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांच्या विळख्यात अडकवून ठेवले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बी.एल.ओ. (BLO), 'एसआयआर' (SIR) यांसारख्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा मुख्य वेळ कागदोपत्री घोळात आणि सर्वेक्षणात जात असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला सर्वस्वी शासनच जबाबदार असल्याचा घणाघात शिक्षकांनी केला. 'आधीच शिक्षकांची कमतरता, त्यात कामांचा डोंगर' अशा धोरणांमुळे शाळा चालवायच्या की सरकारी योजनांचे फॉर्म भरायचे? असा रोखठोक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
           शिक्षकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमधून सुटका व्हावी, यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांना बी.एल.ओ. (BLO) व 'एसआयआर' (SIR) सारख्या सर्व अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्त करावे. टी.ई.टी. (TET) परीक्षा रद्द करण्यात यावी. शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकांनाच प्राधान्य देण्यात यावे. शिक्षकांचे मूळ काम केवळ 'विद्यार्थ्यांना शिकवणे' हेच मर्यादित ठेवण्यात यावे या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार सतिश मासाळ, गटविकास अधिकारी तुषार दांडगे आणि गटशिक्षणाधिकारी विद्या शेळके यांना सुपूर्द करण्यात आले.
          शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात तालुक्यातील सर्वच संघटना एका छत्राखाली आल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनात अखिल प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती, महाराष्ट्र शिक्षक समिती, प्रहार शिक्षक संघटना, कास्ट. कल्याण महासंघ, दिव्यांग कर्मचारी संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांसह सर्वच लहान-मोठ्या संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवून शासनाविरोधात वज्रमूठ आवळली.
           मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बुराडे, सचिव योगराज बोरकुटे, कोषाध्यक्ष संजय सोनकुसरे, तसेच देवानंद तुळकाने, नरेश ठक्कर, भाविक सुखदेवे, प्रल्हाद पाल आणि उषाताई ढोके यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी एकजुटीने या आंदोलनात सहभाग घेतला. तालुक्यातील शाळा शंभर टक्के बंद ठेवून शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केला आणि हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी करून दाखवले. शासनाने जर वेळीच आपली धोरणे बदलली नाहीत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त केले नाही, तर हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. आता चेंडू शासनाच्या कोर्टात असून, 'गुरुजीं'ना केवळ वर्गात शिकवण्याचे स्वातंत्र्य मिळते की कागदपत्रांच्या जगातच अडकवून ठेवले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  Post Views:   840


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी