होमिओपॅथी डॉक्टरांची मेडिकल कॉन्सीलमधील नोंदणी

आयएमएचा तीव्र विरोध; उद्या ब्रह्मपुरीत २४ तास ओपीडी बंद
   

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाने ०५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होत असलेल्या नव्या शासन निर्णयानुसार, ज्या बी.एच.एम.एस (होमिओपॅथी) डॉक्टरांनी सीसीएमपी नावाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केला आहे, अशा डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाणार आहे.
 या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याने जोरदार आवाज उठवला आहे. हा निर्णय सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा, अन्यायकारक व अत्यंत धोकादायक असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना शासनाचा आदेश?
 फेब्रुवारी २०२५ मध्ये आयएमए ने याच निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. तरीही ०५ सप्टेंबर २०२५ला शासन निर्णय काढून लागू करण्याचा शासनाचा निर्णय संभाव्य न्यायालयीन प्रक्रियेचा व न्यायालयाचा अवमान ठरतो, असे आयएमए चे म्हणणे आहे.
सीसीएमपी कोर्स म्हणजे नेमकं काय?
 बी.एच.एम.एस डॉक्टरांसाठी तयार करण्यात आलेला सीसीएमपी कोर्स हा केवळ १ वर्षाचा ब्रिज कोर्स आहे, ज्यामध्ये फार्माकॉलॉजी आणि मेडिसिनसारख्या विषयांचे फक्त प्राथमिक शिक्षण दिले जाते. इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मते, हा कोर्स एम.बी.बी.एस. च्या ५.५ वर्षांच्या सखोल अभ्यासक्रमाच्या तोडीचा अजिबात नाही.
 संभाव्य धोके काय?
 इंडियन मेडिकल असोसिएशन नुसार, जर या कोर्सधारकांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर मान्यता दिली गेली, तर सामान्य रुग्ण भ्रमित होतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, योग्य निदान, औषधांचे अचूक प्रमाण, सर्जरीसंबंधी ज्ञान या सर्व बाबतीत अपुरे शिक्षण असलेल्या डॉक्टरांकडून उपचार केल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या सायंटिफिक प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
ब्रह्मपुरीत २४ तास ओपीडी सेवा बंद
 आयएमए ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने १८ सप्टेंबर सकाळपासून ते १९सप्टेंबर पर्यंत सर्व ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती ब्रह्मपुरी येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आयएमए ब्रह्मपुरीचे अध्यक्ष डॉ. भारत गणवीर, सचिव डॉ. सतीश दोनाडकर, डॉ. नितू गणवीर, डॉ. प्रशांत झोडे, डॉ. राजेश संग्रामे, डॉ. अमोल लिचडे, डॉ. तरल नागमोती, डॉ. राजकुमार कोकरे, डॉ. राव, डॉ. सिद्धेश्वर नारिंगे, डॉ. सावजी, डॉ. संजय कापगते डॉ. श्रीकांत गेडाम, उपस्थित होते.
जनतेला आयएमए चे आवाहन
 डॉक्टरकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक अहर्ता आणि नोंदणी क्रमांक तपासा. आपत्कालीन किंवा सर्जरीसंबंधी उपचारासाठी फक्त एमबीबीएस/एमडी/एमएस/डीएनबी डॉक्टरांकडेच जावे. आरोग्य हा तुमचा मूलभूत हक्क आहे. तो संपूर्ण प्रशिक्षित आणि पात्र डॉक्टरांकडूनच मिळवावा. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने आयोजित पत्रपरिषदेत दिली आहे.

  Post Views:   410




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी