सामाजिक ऋणातून फुलले मनिषाचे दांपत्य जीवन; ब्रह्मपुरीतील नगरसेवकांचा मदतीचा मायेचा हात
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे
"समाज आपला आहे आणि आपण समाजाचे काही देणे लागतो," या उक्तीचा प्रत्यय नुकताच ब्रह्मपुरीत पाहायला मिळाला. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या एका अनाथ मुलीच्या विवाहासाठी ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांपासून तर सर्व नगरसेवकांनी पक्षाभेद विसरून मदतीचा हात पुढे केला. लोकप्रतिनिधींच्या या संवेदनशील पुढाकारामुळे मनिषा नावाच्या अनाथ तरुणीचा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मोलाचे योगदान मिळालं आहे.
ब्रह्मपुरीतील धुम्मनखेडा येथील रहिवासी मनिषा प्रकाश भोयर ही तरुणी अनाथ असून तिच्या पश्चात दोन धाकट्या बहिणी आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर तिन्ही बहिणींनी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवला. मनिषाचे लग्न जुळले खरे, मात्र पदरी असलेल्या गरिबीमुळे लग्नाचा खर्च कसा उचलावा, हा मोठा यक्षप्रश्न बहिणींसमोर होता.
मनिषाच्या लग्नाची अडचण लक्षात येताच नगरसेविका रंजना गिरीश बुराडे आणि नगरसेविका बबीता किशोर आमले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नगराध्यक्ष योगेश बालाजी मिसार व उपाध्यक्ष नितीन उराडे यांच्या मार्गदर्शनात सर्व नगरसेवक या कार्यात हिरीरीने सहभागी झाले.
यामध्ये राकेश पडोळे, प्रकाश खोब्रागडे, चंद्रकांत बावनकुळे, मोंटू पिलारे, मनोज कावळे, अनुकूलजी शेंडे, सतीश हुमणे, सचिन राऊत, स्वीकृत सदस्य वकार खान, पुष्पाकर बांगरे यांनी सढळ हाताने मदत केली.
केवळ पुरुष नगरसेवकच नव्हे, तर महिला नगरसेविकांनीही या कार्यात मोठी भूमिका बजावली. काजल तलमले, माधुरी उपासे, रेणू ठेंगरी, सपना बल्लारपुरे, रंजना पिसे, ज्योती राऊत, गीता मेश्राम आणि जयश्री कुथे, हेमलता सिंहगडे, पुष्पलता पोपटे यांनी एकत्र येत मनिषाच्या लग्नासाठी आर्थिक मदत जमा केली.
नगर परिषद ब्रह्मपुरी येथील काँग्रेस नगरसेवकांनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. गरीब आणि अनाथ मुलीच्या पाठीशी उभे राहून, समाजाप्रती असलेले आपले ऋण त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. लोकप्रतिनिधी फक्त विकासाची कामेच करत नाहीत, तर संकटाच्या वेळी कुटुंबातील सदस्याप्रमाणे धावून येतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. "मनिषा ही मुलगी अनाथ असली तरी ती संपूर्ण शहराची कन्या आहे, या भावनेने आम्ही सर्वांनी हे छोटेसे योगदान दिले आहे. तिच्या सुखी संसारासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी आहेत."अशी भावना यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे 'सामाजिक ऋणाची' एक नवीन पायंडा ब्रह्मपुरीत घातला गेला आहे.