ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय,ब्रम्हपुरी येथे गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न

   

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) – स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन,ब्रम्हपुरीयांच्या वतीने नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी गणवेश वितरण सोहळा अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. अशोकजी भैया साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव आदरणीय ॲड. श्री भास्कररावजी उराडे साहेब, संस्थेचे जेष्ठ सदस्य आदरणीय प्रा. सुभाषजी बजाज सर यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी विचारमंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. के. एम. नाईक सर आणि पर्यवेक्षक मा. प्रा. पी. आर. जिभकाटे सर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील शिक्षिकांनी सादर केलेल्या स्वागतगीताने अतिथी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
     प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक आदरणीय श्री. के. एम. नाईक सर यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ यासारख्या विशेष उपक्रमांतील सहभागाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावले.
         संस्थेचे सहसचिव आदरणीय ॲड. श्री भास्कररावजी उराडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना कठोर मेहनतीचे महत्त्व सांगताना, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
       संस्थेचे जेष्ठ सदस्य आदरणीय प्रा. सुभाषजी बजाज सर यांनी विद्यार्थ्यांना गणित या विषयाच्या अभ्यासातील सोप्या मार्गांचे मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दुर केली व विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे उद्दिष्ट ठेऊन प्रगती साधावी असा मोलाचा सल्ला दिला.

       अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव आदरणीय श्री. अशोकजी भैया साहेब यांनी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरीच्या उदयापासून ते आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतला. "ही संस्था कधीकाळी एका छोट्या रोपट्याप्रमाणे होती, आज ती हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा वटवृक्ष बनली आहे," असे ते भावनिक शब्दांत म्हणाले.
  ते पुढे म्हणाले की, "कर्मयोगी स्व. मदनगोपालजी भैया यांच्या दूरदृष्टीमुळे समाजातील बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे समान आणि सुलभ माध्यम उपलब्ध झाले. 1996 पासून संस्थेच्या वतीने सातत्याने गणवेश वितरणाचा उपक्रम राबवला जात आहे आणि ही परंपरा आजही आम्ही जपतो आहोत.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निशिकांत बोरकर सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन भावना मेश्राम मॅडम यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि पालक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.  हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ गणवेश वितरणापुरता मर्यादित न राहता शिक्षणाच्या मूलभूत गरजांबरोबरच प्रेरणादायी विचारांची शिदोरी देणारा ठरला हे विशेष.

  Post Views:   93



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी