काय सांगताय.. घरात एक लाईट, एक पंखा, बिल आलं तब्बल ७७ हजार रूपये!

   

ब्रम्हपुरी/महेश पिलारे
 अनेकदा महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगांव खुर्द येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका नागरिकाला एक महिन्याचे विजेचे बिल तब्बल ७७ हजार रुपयांपेक्षा जास्त आले आहे. हा कुणी कारखानदार किंवा हॉटेल व्यावसायिक नाही तर मजूरी करणारा सर्वसामान्य ग्रामस्थ आहे. बिल पाहिल्यानंतर मजूरी करणार्‍या ग्रामस्थाने देखील डोक्यावर हात मारुन घेतला आहे. 
  वीज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. अनेक कामे विजेवर केली जात असल्याने वीज ही आवश्यक असते. यासाठी ग्राहक दर महिन्याला महावितरणला बिल अदा करत असतात. मात्र महावितरणकडून चुकीचे बिल पाठवणे, अवाजवी मीटर रीडिंग, मनमानी पद्धतीने लाईट बिल आकारणी करणे अशा अनेक घटनांमुळे ग्राहक त्रस्त आहेत. अशातच असाच काहीसा फटका ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगांव खुर्द येथील वास्तव्य करणार्‍या सर्वसामान्य कुटूंबातील मजूराला दिला आहे. या सर्वसामान्य मजूराच्या घरात एक लाईट आणि एक पंखा आहे असे असताना देखील त्यांना वीज महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल ७७ हजार १३० रुपयांचे बिल पाठवले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
 अधिक माहिती अशी आहे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगांव खुर्द येथे राहणारे नागेश्वर अलोने हा मजूरीचा काम करतो. घरात रहाणारे तिघेच जण. त्यातही नागेश्वर हा मजूरीवरच अवलंबून असून त्यावर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो. घरात एक लाईट आणि एक पंखा आहे. दर महिन्याकाठी अलोने यांना अंदाजे ३०० ते ६०० रूपयांदरम्यान विज देयक येत असते. असे असताना देखील महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल ७७ हजार १३० रुपयांचे बिल पाठवले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला. रोजंदारीवर काम करून हातावर आणणे आणि पानावर खाने ही त्याची नित्याची दिनचर्या असणार्‍याला महावितरणने अव्वाच्या सव्वा बिल पाठवून झटका दिला आहे. त्यातल्या त्यात महागाईमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी दर महिन्याला बील भरलेले असताना, माझी कोणतीही थकबाकी नसताना मला ७७ हजार रुपयांचे बील का देण्यात आले? हजारो रूपयांचे विद्युत देयक भरण्याच्या चिंतेने नागेश्वर अलोने ग्रासले आहे.
महावितरणची कमालच.... 
 माझ्याकडे कोणतीही थकबाकी नाही, मी दर महिन्याला विजेचे बिल भरलेले असताना देखील मला महावितरण कार्यालयाने ७७ हजार रुपयाचे देयक पाठविले. देयक आल्याचे पाहून मला धक्काच बसल्याचे या व्यक्तीने आमच्या प्रतिनिधींना सांगितले. मी गरीब व्यक्ती आहे, माझी थकबाकी नसताना इतके बिल कसे आणि का भरु असा सवाल नागेश्वर अलोने यांनी केला आहे.

  Post Views:   864



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी