पत्नीवर सत्तूरने जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी

   

ब्रह्मपुरी :
            पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर सत्तूरने प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुनिम तुळशीराम नागदेवते (वय ५९, रा. उदापूर, ता. ब्रह्मपुरी) या पती आरोपीला चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
          दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित पत्नी मंगला मुनिम नागदेवते (वय ५३, रा. उदापूर, ता. ब्रह्मपुरी) या आपले हॉस्पिटलचे काम आटपवून घरी परत येत असताना, आरोपी पती मुनिम नागदेवते याने स्वागत मंगल कार्यालयामागे त्यांना गाठले आणि 'घरी चाल' असे म्हटले. मंगला यांनी घरी जाण्यास नकार दिला असता, चारित्र्याच्या संशयातून आरोपीने स्वतःजवळील सत्तूरने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
           या प्रकरणी पीडिता मंगला नागदेवते यांच्या बयानावरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस ठाणे ब्रह्मपुरी येथे तात्काळ गुन्हा नोंद (क्र. ४८/२०२३, कलम ३०७ भादंवि) करून आरोपी मुनिम नागदेवते याला अटक करण्यात आली होती. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि महत्त्वाचे परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी पी. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या न्यायालयात पार पडली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. सुधाकर डेगावार यांनी मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले साक्ष-पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरले. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी मुनिम नागदेवते याला कलम ३०७ भादंवि अंतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
           ही संपूर्ण कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे आणि दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  Post Views:   969


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी