स्वातंत्र्यदिनी ब्रह्मपुरीच्या इतिहासाला उजाळा!

ब्रह्मपुरीतील ऐतिहासिक वास्तू आजही देताहेत ब्रिटिशांच्या खाणाखुणांची साक्ष!
   

ब्रह्मपुरी/ महेश पिलारे :
               १५ ऑगस्ट १९४७... भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस! या दिवशी ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला आणि आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रज गेले खरं, पण त्यांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत त्यांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी आजही आपल्या आसपास उभ्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातलं आपलं ब्रह्मपुरी शहरही याला अपवाद नाही. तुम्हाला ठाऊक आहे का? १८५४ मध्ये जेव्हा इंग्रजांनी 'चांदा' (म्हणजेच आजचा चंद्रपूर) जिल्ह्याची निर्मिती केली, तद्नंतर १८७४ साली स्थापन झालेल्या मूळ तीन तहसील मुख्यालयांपैकी ब्रह्मपुरी हे एक महत्त्वाचं केंद्र होतं! स्वातंत्र्याच्या या खास प्रसंगी, इंग्रजांच्या काळात उभारलेल्या ब्रह्मपुरीतील अशाच काही खास वास्तू आणि त्यांच्या आजच्या स्थितीचा घेतलेला हा एक रंजक आढावा.. 
        ब्रह्मपुरी शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात ब्रिटिशांनी स्वतःच्या खेळासाठी आणि मनोरंजनासाठी एक टेनिस क्लब सुरू केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज अधिकारी संध्याकाळच्या वेळी इथे जमायचे. आज ही वास्तू ब्रिटिशांच्या त्या काळातील जीवनशैलीची आणि शहराच्या ऐतिहासिक भूतकाळाची साक्ष देत शांतपणे उभी आहे.
          ब्रह्मपुरी हे मुख्य प्रशासकीय केंद्र असल्याने ब्रिटिशांनी इथे उपविभागीय अधिकारी (SDO) आणि तहसील कार्यालय बांधलं होतं. या इमारतींची रचनाच वेगळी होती. उंच छत, भक्कम लाकडी कैच्या आणि प्रचंड रुंद दगडी भिंती! इंग्रजी स्थापत्यकलेचा हा एक उत्तम नमुना होता. काळाच्या ओघात ही जुनी इमारत मोडकळीस आल्यामुळे तिथे प्रशासनाने आता नवीन आणि आधुनिक सोयींची इमारत उभारली आहे. पण जुन्या इमारतीचा तो रुबाब आजही जुन्या लोकांच्या आठवणीत ताजा आहे.
              वैनगंगा नदीचा परिसर आणि आसपासचं दाट जंगल यामुळे ब्रिटिश अधिकारी इथे नेहमी दौऱ्यावर किंवा शिकारीसाठी यायचे. त्यांच्या राहण्यासाठी शहरात 'डाक बंगले' म्हणजेच विश्रामगृहं बांधली गेली. या बंगल्यांना मोठे व्हरांडे, भक्कम लाकडी खांब आणि भरपूर हवा खेळती राहील अशा मोठ्या खिडक्या असत. आजही सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) जुने विश्रामगृह या नावाने ही वास्तू ओळखली जाते आणि वापरात आहे. परंतु काळाच्या ओघात ते पण मोडकळीस आल्यामुळे, त्यांच्या ठिकाणी नवीन इमारतीने जागा घेतली. 
           इंग्रजांनी या भागातील लाकूड आणि खनिजांची वाहतूक करण्यासाठी चंद्रपूर, नागपूर आणि गोंदियाला जोडणारी 'नॅरो गेज' (छोट्या रुळांची) रेल्वे सुरू केली होती. जुन्या स्टेशनची दगडी इमारत आणि तिथली हाताने चालवणारी सिग्नल यंत्रणा ही त्या काळातील तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना होती. नॅरो गेज गाड्या खूप हळू चालायच्या. त्यामुळे काळ बदलला आणि तिथे नवीन ब्रॉडगेज लाईन आली. गाड्या बदलल्या, रुळ बदलले, पण तरी ब्रह्मपुरीतील रेल्वे स्थानकाची मूळ जागा आणि ब्रिटिशकालीन रेल्वेच्या रचनेचा पाया आजही तोच आहे. ब्रह्मपुरीतील जरी मालगुजारी तलाव मूळचे स्थानिक गोंड राजे आणि मालगुजारांनी बांधले असले, तरी ब्रिटिशांनी त्यांच्या कार्यकाळात महसूल व सिंचन सुधारणांसाठी या तलावांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी व देखभाल व्यवस्था निश्चित केली होती. ब्रह्मपुरी शहरात थेट नसले तरी या उपविभागात इंग्रजांनी 'घोडाझरी तलाव' आणि 'आसोलामेंढा जलाशय' यांसारखे मोठे सिंचन प्रकल्प उभारले. त्या काळात पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. या तलावांचे दगडी सांडवे आणि लोखंडी दरवाजे आजही तितकेच भक्कम आहेत. स्वातंत्र्याला एवढी वर्षं झाल्यानंतरही हे प्रकल्प आजही आपल्या भागातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरत आहेत.
         इंग्रजांनी इथे इमारती आणि रस्ते बांधले असले, तरी ब्रह्मपुरीने इंग्रजी सत्तेविरोधात लढाही तितक्याच ताकदीने दिला. पंडित बाळगोविंद आणि आत्माराम मुकुंद महाजन यांसारख्या आपल्या स्थानिक नेत्यांनी याच इंग्रजी अधिकाऱ्यांसमोर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनातही ब्रह्मपुरी-चिमूर परिसर क्रांतीचा मुख्य केंद्रबिंदू बनला होता. थोडक्यात काय तर १५ ऑगस्ट १९४७ नंतर आपल्या देशाने आणि शहराने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. पण आजही ब्रह्मपुरीत उभ्या असलेल्या या जुन्या वास्तू आपल्याला आपल्या इतिहासाची, संघर्षाची आणि बदलत्या काळाची आठवण करून देतात. स्वातंत्र्याच्या या अमृत काळात या वास्तू ब्रह्मपुरीच्या समृद्ध वारशाची साक्ष देत आजही खंबीरपणे उभ्या आहेत.

  Post Views:   495


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी