शिक्षणाचे माहेरघर की बेपत्ता मुलींचे केंद्र? ब्रह्मपुरीत १८ दिवसांत ६ मुली गायब; पालकांमध्ये भीतीचे सावट!
ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
ज्या शहराला विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृतपणाचा वारसा लाभला आहे, त्या ब्रह्मपुरी शहराला सध्या एका अज्ञात भीतीचा विळखा पडला आहे. अवघ्या १८ दिवसांच्या कालावधीत ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनांनी संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. 'लेक वाचवा'च्या घोषणा एका बाजूला घुमत असताना, प्रत्यक्षात मात्र घराबाहेर पडलेली 'लेक' सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता प्रत्येक पालकाला सतावू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या १८ दिवसांत सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील बहुतांश मुली या नेहमीप्रमाणे शाळेत किंवा कोचिंग क्लासला गेल्या होत्या. मात्र, क्लासची वेळ संपूनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यांच्या सायकली कॉलेज आणि क्लासच्या परिसरात बेवारस स्थितीत सापडल्याने, हे साधे बेपत्ता होणे नसून सुनियोजित अपहरणाचे कटकारस्थान असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पालकांनी दिलेल्या तक्रारींनुसार, अज्ञात व्यक्तींनी या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून किंवा काहीतरी फूस लावून पळवून नेले असावे, असा दाट संशय आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या सहा घटनांमुळे शहरात एखादी टोळी सक्रिय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भरदिवसा गर्दीच्या ठिकाणांहून मुली गायब होत असल्याने गुन्हेगारांचे धाडस शिगेला पोहोचल्याचे दिसून येते.
या प्रकरणांमुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. पोलिसांनी सर्व सहा प्रकरणांत अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. ब्रह्मपुरी शहर हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. शेकडो मुली दररोज शिक्षणासाठी गावातून शहरात येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पालकांना आवाहन करताना म्हटले की, आपल्या मुलांच्या रोजच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधा, जेणेकरून ते त्यांच्या मनातील भीती किंवा प्रलोभने तुम्हाला सांगू शकतील. अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे संस्कार त्यांच्यावर करा. असे सांगून सतर्क केले आहे.
१८ दिवसांतील या ६ घटनांनी ब्रह्मपुरीचे समाजमन सुन्न झाले असून, आता सर्वांच्या नजरा पोलीस तपासाकडे लागल्या आहेत. आपल्या लेकी पुन्हा सुखरूप घरी येतील का? याच चिंतेत आज ब्रह्मपुरीतील अनेक घरे अंधारात आहेत.
शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींच्या सायकली स्टँडवर राहतात, पण मुली घरी परतत नाहीत, ही बाब समाजासाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत खेदजनक आहे. सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे." - एक चिंतेत असलेला पालक.