ब्रम्हपुरी पोलिसांचा दारू तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक! हळदा शिवारातून कारसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तर खेड (टोली) येथे हातभट्टी उद्ध्वस्त
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :
अवैध दारू तस्करांविरोधात ब्रम्हपुरी पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, सलग दोन मोठ्या कारवायांनी दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या कारवाईत १ जूनच्या रात्री हळदा परिसरात एका निळ्या रंगाच्या फोर्ड फिगो कारमधून होणारी देशी दारूची चोरटी वाहतूक पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत २ जून रोजी सकाळी खेड (टोली) येथे चालणाऱ्या मोहा फुलाच्या हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी हजारो रुपयांचे साहित्य नष्ट केले आहे.
मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, सोमवार दिनांक १ जून २०२६ रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास मौजा हळदा येथील बस स्टॉपकडून गोशाळेजवळील गोसेखुर्द उपकालव्याच्या पाळीने एका कारमधून देशी दारूच्या पेट्या विक्रीसाठी नेल्या जाणार होत्या. या माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंडकी पोलीस चौकीच्या अंमलदारांनी तातडीने हळदा परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारी एक निळ्या रंगाची फोर्ड फिगो कार (क्रमांक: MH 31 DK 0647) पोलिसांनी थांबवली. कारची कसून झडती घेतली असता, पोलिसांना आतमध्ये देशी दारूचे ५० कागदी खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात ९० एम.एल. मापाच्या १०० नग 'रॉकेट संत्रा' देशी दारूच्या बाटल्या होत्या. जप्त करण्यात आलेला मुद्देमालात देशी दारू एकूण ५० खोक्यांमधून २,००,००० रुपये किमतीच्या ५,००० दारूच्या बाटल्या व वाहन अंदाजे किंमत ३,००,००० रुपये किमतीची फोर्ड फिगो कार असा एकूण एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक अरुण उर्फ मारोती रामचंद्र लाडवे (वय ३६ वर्षे, रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी) याला जागीच ताब्यात घेतले आहे. तसेच, या दारू साठ्याची मालकी असलेला त्याचा साथीदार हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टाक (वय ४० वर्षे, रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी) या दोघांच्या विरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५०४/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी अंदाजे ०७:१५ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा खेड (टोली) येथे वसंत राऊत हा आपल्या घरासमोरील अंगणात मोहा फुलाची हातभट्टी लावून गावठी दारू तयार करत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह तात्काळ खेड (टोली) येथे धाड टाकली. तेथे आरोपी वसंत वासुदेव राऊत (वय ३६ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. खेड (टोली), ता. ब्रह्मपुरी) हा घरासमोरील अंगणात हातभट्टीवर मोहा दारू गाळताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दारू व सडवा जप्त केला. यात मोहा सडवा १२५ लीटर (१ प्लास्टिक ड्रममध्ये), किंमत रु. १२,५००/- आणि मोहा दारू ३० लीटर (३ प्लास्टिक कॅनमध्ये), किंमत रु. ६,०००/- आणि इतर साहित्य अंदाजे किंमत ७००/- रुपये असा एकूण १९,२०० रुपये मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५०५, कलम ६५(बी), ६५(सी), ६५(इ), ६५(फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाया चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, ब्रम्हपुरी विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे आणि ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे आणि पो. उप. नि. धनराज सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रतन लेनगुंरे, मिलिंद नैताम, मुकेश गजबे, अमोल लोनबले, पुरुषोत्तम भरडे, मंडल, अनिल आगासे, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार आणि इरशाद खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.