ब्रम्हपुरीतील वैकुंठ स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत
ब्रम्हपुरी/का.प्र.
सर्व सोयीयुक्त शहर म्हणून ब्रम्हपुरी नावाजलेली आहे. ब्रम्हपुरी शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामानाने येथील नगर परिषद नागरिकांसाठी सोई सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे दररोज अत्यंविधी होतात. मात्र, प्रशासनाच्या दूर्लक्षामुळे ही स्मशानभूमी अत्यंत गलिच्छ झाली आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ब्रम्हपुरीतील वैकुंठ स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत आली आहे.
ब्रम्हपुरी नगरपालिका क्षेत्रात १० प्रभाग अस्तित्त्वात आहेत. यात प्रति प्रभागात दोन वार्डांचा समावेश होतो. ब्रम्हपुरी शहर हे शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा व सांस्कृतिक नगरी म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे येथील लोकसंख्येत आपसूकच वाढ झाली आहे. येथे जन्म मृत्यू दराचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे दर दिवसाआड शहरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होतात. स्मशानभूमी परिसरात सध्यास्थितीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अत्यंविधीसाठी वापरलेले साहित्य मोकळ्या जागेत विखुरलेले आहेत़ सगळीकडे पालापाचोळा, अवास्तव वाढलेली झाडे-झुडपे, कपड्यांचे गाठोडे पडून असल्याचे वास्तव सध्यास्थितीवरून दिसून येत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सोई सविधा पुरविण्याबाबत नगर पालिका प्रशासन असमर्थ ठरले असून, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुदैव म्हणजे ब्रम्हपुरी नगरपालिकेत ऐन पावसाच्या तोंडावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पससले असतांना, स्वच्छता निरिक्षक पद रिक्त असणे, ही लाजीरवाणी बाब आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेत स्वच्छता निरिक्षक नसणे म्हणजे शहराला वार्यावर सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर परिषदेला स्वच्छते विषयी कोणतेही सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीतील वैकुंठ स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत आली असल्याचे चिन्हे आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात मल:निस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्त्याचे चाळण झाले असून, नगरपालिकेला या समस्येशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते तात्काळ दुरूस्त करावे व मरणासन्न अवस्थेत आलेल्या स्मशानभूमीला घाणीच्या विळख्यातून बाहेर काढून नवजीवन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वासू सोंदरकर यांनी केली आहे.