ना. विजयभाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते?
ब्रह्मपुरी/ महेश पिलारे
वरील मथळा वाचून तुमच्या डोक्यात प्रश्न पडलाय ना? हाच प्रश्न मला आणि तुमच्यासारख्या सुजान नागरिकांना पण पडला. पण हा प्रश्न ब्रह्मपुरी शहरात उपस्थित केलाय 'त्या' एका फलकाने. होय,"माननीय नामदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते" अशा आशयाचे मोठ्या स्वरूपातील फलक ब्रह्मपुरी शहरात झळकत आहे. मोठ्या थाटात झळकत असलेल्या 'त्या' फलकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ब्रह्मपुरी शहरातील बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे चौक येथील रहदारीच्या मार्गावर असलेल्या 'त्या' फलकाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना अचंबित केले आहे.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरू आहे. संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून विधानसभा अध्यक्ष हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा यांच्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेतात. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने भास्कर जाधव यांचे नावावर शिक्कामोर्ब्बत करून, तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. परंतु अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता यांची निवड केली नाही. त्यामुळे विधान सभेत विरोधी पक्षनेता पदाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
परंतु ब्रह्मपुरी शहरात लागलेल्या 'त्या' फलकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. "माननीय नामदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते" अशा आशयाचे मोठ्या स्वरूपाचे फलक चौकात मोठ्या थाटात उभे आहे. फलकावर विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र आहे, केवळ नाव आणि "महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते" म्हणूनच उल्लेख आहे. ना शुभेच्छा देणाऱ्यांचे नाव, ना कुणाचे फोटो. त्यामुळे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांचा हा फलक शहरात सध्या जोरदार चर्चेचा विषय आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचे जरी नाव विरोधी पक्ष नेता पदासाठी दिले असले, तरी अद्याप विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांची नियुक्ती केली नाही, हे विशेष. त्यामुळे ब्रह्मपुरीतील विजय वडेट्टीवर यांच्या समर्थकांना विजय वडेट्टीवार हे परत, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते पदी विराजमान व्हावे, यासाठी म्हणून त्यांनी या आशयाचे बॅनर तर लावले नाही ना? अशी चर्चा जनमानसात रंगत आहे. विधानसभा अध्यक्षांचा विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय लांबत असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागणार तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. सदर फलक जुने म्हणावे तर ते जुने असल्यासारखे दिसून येत नाही, त्यामुळेच हे फलक नवीन असल्याचे जाणकारांद्वारे कळते. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, विरोधी पक्षनेते पदाला पगार, भत्ते आणि सुविधा तसेच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचा व सरकारला जाब विचारण्याचा तसेच विधानसभेच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा आणि प्रस्तावावर विरोधी पक्षनेतेची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचे असते, आणि कोणताही मुरब्बी राजकारणी हा सत्ते शिवाय राहूच शकत नाही? त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या मनात असलेली खंत? तर समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून बोलून तर दाखवली नाही ना?अशी ही चर्चा जण माणसात रंगत आहे. शेवटी राजकीय विश्लेषकांच्या मते, असेच म्हणता येईल की, पोटातले ओठात आले.