माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरीत उद्या भव्य मोफत रोगनिदान व रक्तदान शिबिर
ब्रम्हपुरी :
जनसेवेचा वारसा निष्ठेने जपणारे, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका विशेष आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "लोकांचे आरोग्य, हीच खरी सेवा" हा ध्यास उराशी बाळगून आयुष्यभर जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे प्रा. अतुल देशकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क भव्य रोगनिदान व रक्तदान सदर शिबीर उद्या दिनांक २७ जुलै २०२६ (सोमवार) ला सकाळी १०:०० वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह, ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रा. अतुल देशकर यांनी नेहमीच राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. ब्रम्हपुरीच्या विकासासाठी त्यांनी लावलेले योगदान आणि सर्वसामान्य, गोरगरीब जनतेशी बांधून ठेवलेली नाळ यामुळेच लोकांच्या हृदयात त्यांचे स्थान अबाधित आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारे उपक्रम राबवणे ही ब्रम्हपुरीची परंपरा बनली आहे.
या भव्य आरोग्य शिबिरामध्ये विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि निदान केले जाणार आहे. हृदयरोग, कर्करोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सा (सर्जरी), नेत्ररोग तसेच मोफत रक्ततपासणी या शिबिरामध्ये उपलब्ध असेल. रोगांचे निदान झाल्यानंतर ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज भासेल, त्यांच्यावर आशा हॉस्पिटल (कामठी, नागपूर) येथे निशुल्क शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच नेत्र तपासणीनंतर मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया नागपूर येथील प्रतिष्ठित रुग्णालयात पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. या सामाजिक उपक्रमाला आशा हॉस्पिटल (कामठी, नागपूर), डॉ. हेडगेवार रक्तपेढी (ब्रम्हपुरी) आणि ग्रामीण रुग्णालय (ब्रम्हपुरी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
गोरगरीब आणि गरजूंना वैद्यकीय उपचारांचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागू नये, या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व बंधू-भगिनींनी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजक प्रा. डॉ. सुयोग बाळबुधे, तनय देशकर, ज्ञानेश्वर दिवटे, मनोज भूपाल आणि साकेत भानारकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.