काळाचा घाला!७७ व्या प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टरने चिरडलेल्या यशची ४० दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली

   

 ब्रह्मपुरी:
        ज्या दिवशी संपूर्ण देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता, त्याच दिवशी ब्रह्मपुरीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या 'मृत्यूच्या दूताने' दोन निष्पाप विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. २६ जानेवारी रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला १४ वर्षीय यश प्रकाश मेश्राम याची अखेर ४० दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली आहे. काल, ६ मार्च २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यात संताप आणि शोककळा पसरली आहे.
               २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास, नेवजाबाई हितकारिणी शाळेचे एनसीसी (NCC) विद्यार्थी यश मेश्राम आणि त्याचा मित्र रोनक नागापुरे (वय १४) हे दोघे आपल्या ॲक्टिव्हा मोपेडने ध्वजारोहणासाठी शाळेत जात होते. बोंडेगाव ते कुर्झा रोडवरील राधाकृष्णनगरी जवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या भरधाव  ट्रॅक्टरने (क्र. MH-34-CD-7668) त्यांना जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक दुर्योधन गजानन तलमले (रा. भालेश्वर) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर अत्यंत निष्काळजीपणे चालवत होता. या धडकेत यशच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती, तर रोनकच्या पायाला मोठी दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आरोपी चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला होता.अपघातानंतर यश मेश्राम याला ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमधील आयसीयू (ICU) मध्ये दाखल करण्यात आले होते. गेली ४० दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, काल ६ मार्च रोजी त्याची ही झुंज अपयशी ठरली. एका उमद्या आणि शिस्तप्रिय एनसीसी विद्यार्थ्याचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशीही पहाटेपासून हे मृत्यूचे दूत रस्त्यावर मोकाट कसे धावतात? असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारत आहेत. 

  Post Views:   892




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी