ब्रम्हपुरीत दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या घरातून ११ लाखांचे दागिने लंपास

दोन अज्ञात इसमांनी बनावट चावीने किंवा कुलूप तोडून साधला चोरीचा डाव; परिसरात खळबळ
   

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
 शहरातील आरमोरी रोडवरील कृष्णा कॉलनी परिसरात एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील ११ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र मारोती चापले (वय ५९), रा. कृष्णा कॉलनी, हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास ते आपल्या कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. घराच्या मुख्य दरवाजाला आणि लोखंडी गेटला व्यवस्थित कुलूप लावून ते बाहेर पडले होते.
          संध्याकाळी ५:१५ वाजताच्या सुमारास जेव्हा चापले कुटुंब घरी परतले, तेव्हा त्यांना लोखंडी गेट उघडल्यानंतर मुख्य लाकडी दरवाजाची कळी तुटलेली आढळली. घरात प्रवेश केला असता, बेडरूममधील लाकडी आणि लोखंडी आलमारीचे दरवाजे उघडे होते आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी आलमारीतील लॉकर फोडून ४० ग्रॅमचा सोन्याचा राणी हार (किंमत ५.५२ लाख), २२ ग्रॅमचे सोन्याचे दोन गोफ (किंमत २.२० लाख), दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ७५ हजार), सोन्याचे टॉप्स आणि नथ (किंमत ६५ हजार),१०.५० ग्रॅमची सोन्याची पोत (किंमत १.५५ लाख), व नगदी रक्कम: २,०००/- रुपये असा एकूण मुद्देमाल ११,१९,०००/- रुपये लंपास केला. घटनेनंतर परिसरात चौकशी केली असता, शिवनगर येथील एका मुलाने महत्त्वाची माहिती दिली. दुपारी दोन अज्ञात इसम काळ्या रंगाचे कपडे घालून आणि तोंडाला काळा दुपट्टा बांधून विना क्रमांकाच्या मोटारसायकलने आले होते. ते संरक्षण भिंतीवरून चापले यांच्या घरात शिरताना दिसले आणि काही वेळाने उदापूर रोडच्या दिशेने पसार झाले.
           या गंभीर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रामचंद्र चापले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने शहरात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

  Post Views:   1802


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी