माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा गौरव
पालक व माजी विद्यार्थी सभा : प्राचार्य डॉ. गहाणे
ब्रह्मपुरी/का.प्र.
‘ज्ञानसाधनेसाठी पुढे जाणारा विद्यार्थी आयुष्यातही सतत पुढे जातो. नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय हे विदर्भातील शिक्षणाची गंगोत्री राहिली आहे. सचिव अशोक भैयांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आता अटकेपार पोहचली. लाखो विद्यार्थ्यांनी इथे येऊन शिक्षण घेतले व आज ते देशात, परदेशात मोठया पदावर कार्यरत आहेत. हे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचा गौरव आहेत.' असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणेंनी केले.
ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील स्व. हिरालालजी भैया सभागृहात पालक व माजी विद्यार्थी सभेत अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सक्रीय सचिव अशोक भैयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. विचारपीठावर उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, सदस्य डॉ. धनराज खानोरकर, पर्यवेक्षक प्रा. मेजर विनोद नरड, प्रा. आनंद भोयर, डॉ. प्रकाश वट्टी, प्रा. ओजस्विनी बावनकुळे, संघटना प्रभारी डॉ. राजू आदे इ.मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते हुशार, होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ..राजू आदेंनी तर संचालन प्रा. मनिषा लेनगुरे व आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका उइकेनी केले. सभेला पालक व माजी विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.