ब्रह्मपुरीत पालिकेची धडक कारवाई; नियमबाह्य टिल्लूपंप लावून पाणी खेचणाऱ्यांचे एकूण २८ पंप जप्त!
- मोहित ढोकणे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या विशेष पथकाचा ॲक्शन प्लॅन; शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हे दाखल
ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी :
उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि नळ जोडणीला बेकायदेशीरपणे टिल्लूपंप (मोटार) लावून पाणी खेचणाऱ्या नागरिकांविरोधात ब्रह्मपुरी नगर परिषदेने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकाने शहरातील विविध प्रभाग आणि वॉर्डांमध्ये धडक मोहीम राबवून आतापर्यंत एकूण २८ बेकायदेशीर टिल्लूपंप जप्त केले आहेत. पालिकेच्या या कारवाईमुळे नियमबाह्यपणे पाणी खेचणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील काही नागरिक आपल्या नळांना बेकायदेशीरपणे टिल्लूपंप लावून मोठ्या प्रमाणावर पाणी खेचत असल्याच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. या कृत्यामुळे जलवाहिन्यांमधील पाण्याचा दाब (प्रेशर) कमालीचा कमी होत असून, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या इतर सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नव्हते. शहरात यामुळे मोठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. या समस्येची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी एका विशेष आदेशान्वये 'टिल्लूपंप जप्ती पथकाची' स्थापना केली.
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, हे विशेष पथक २ मे २०२६ पासून आठवड्यातून ४ दिवस (पावसाळा सुरू होईपर्यंत) सकाळी आणि संध्याकाळी पाणी सोडण्याच्या वेळेत वॉर्डा-वॉर्डांमध्ये फिरून शोध मोहीम राबवत आहे. कारवाई दरम्यान नागरिकांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत किंवा वाद घातल्यास, संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी मोबाईलद्वारे संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो शूटिंग करत आहेत. जप्त केलेले टिल्लूपंप कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना परत केले जाणार नाहीत, असा सक्त इशारा पालिकेने दिला आहे.
शहरात आतापर्यंत तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यात दिनांक ०५ मे २०२६ रोजी आंबेडकर वॉर्ड आणि बालाजी वॉर्डातून ०६ टिल्लूपंप जप्त करण्यात आले. तसेच दिनांक ०६ मे २०२६ भवानी वॉर्डात धडक मोहीम राबवून ०८ टिल्लूपंप जप्त केले. आणि दिनांक १६ मे २०२६ भवानी वॉर्ड आणि बालाजी वॉर्डात पुन्हा मोठी कारवाई करत १४ टिल्लूपंप नगरपरिषद प्रशासनाने जप्त केले आहेत.
ही धडक कारवाई नगर परिषदेचे पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता मोहित ढोकणे, पाणीपुरवठा फिटर ललित काळे, शिपाई दुधराम बेदरे, यांच्यासह पालिकेचे पंपचालक, वालमन आणि इतर कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ लिपिक डी. एन. हटवार या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
मुख्याधिकाऱ्यांनी केवळ नागरिकांनाच नाही, तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कडक ताकीद दिली आहे. टिल्लूपंप जप्तीच्या कामात कोणत्याही कर्मचाऱ्याने हयगय किंवा कुचराई केल्यास त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच कंत्राटी कामगारांनी यात कसूर केल्यास त्यांना कामावरून तडकाफडकी कमी करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
"शहरातील सर्व नागरिकांना समान आणि पुरेशा दाबाने पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नागरिकांनी नळाला बेकायदेशीर मोटार लावू नये, अन्यथा पंप जप्तीसह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल," असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.