त्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच

गावात उलट सुलट चर्चांना उधान
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
            ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप तोडून ग्रामपंचायतीतील कपाटा मधील कागदपत्रे जाळपोळ केल्याची १६ मार्च २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ब्रम्हपूरी तालुक्यातील पारडगाव येथे घडली होती. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात ठेवलेले महत्वपूर्ण दस्तऐवज आगीत भस्मसात झाले होते. घटना स्थळावर जाळपोळ करण्यासाठी वापरण्यात आलेल पुरावे आढळून आले होते. सदर प्रकरणास दीड महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा जाळपोळ प्रकरणातील अज्ञात आरोपी अद्यापही मोकाटच आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधान आले असून, या प्रकरणात नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
           गावाचा कारभार चालविण्यासाठी शासनातर्फे ग्रामपंचायतची निर्मिती करण्यात आली. याच ग्रामपंचायत अंतर्गत गावात झालेले जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, गृहकर पाणीकर वसुली, गावाच्या विकासासाठी योजना राबविणे यांसारखे अनेक महत्वपूर्ण कामे केल्या जातात. ब्रम्हपूरी तालुका मुख्यालयापासुन सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या पारडगाव येथील मुख्य चौकात ग्रामपंचायत कार्यालय आहे. १६ मार्च २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असलेल्या आलमारीचा कुलूप तोडून ते पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. घटनेची माहिती मिळताच सरपंच पिंटु पिल्लेवान यांना ग्रामपंचायतीचे दार उघडे दिसले. तेव्हा गावचे पोलिस पाटील यांना बोलावून ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला सदरची माहिती कळविली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी टाकुन आग विझविण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांची जाळपोळ करण्यासाठी अज्ञात इसमाने पेट्रोलचा वापर केला, त्यासंबंधीचा पुरावा म्हणून पेट्रोल बॉटल सदर ग्रामपंचायत मध्ये आढळून आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडण्यात आले, मात्र घटनास्थळी कुलूप आढळून आले नाही? त्यामुळे सदर प्रकार हा जाणीवपूर्वक कटकारस्थान असल्याचे कळते. ग्रामपंचायत कार्यालयात विकास कामांमध्ये अनियमितता? असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गोळा केलेला कराचा भरणा संबंधित ग्रामपंचायत कर्मचार्‍याकडून ग्रामपंचायत मध्ये भरण्यात आला नसल्यामुळे तर कागदपत्रांची होळी केली नसावी ना? सदर प्रकरण ज्या महिन्यात घडले, ते मार्च एंडींग असल्यामुळे आपली गैरकृत्य बाहेर येवून, आपले पितळ उघडे पडणार? त्यामुळे नियोजित कटआखून, त्याला मूर्त रूप देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला आहे? असे एक नव्हे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले होते.
         घटना स्थळावर जाळपोळ करण्यासाठी अज्ञात आरोपीने पेट्रोलचा वापर केला होता, त्याचा सबळ पुरावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात पेट्रोल बॉटल आढळून आले होते. सदर प्रकरणास दीड महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा जाळपोळ प्रकरणातील अज्ञात आरोपी अद्यापही मोकाटच आहे. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाची दस्तावेज जळाल्यामुळे महत्वपूर्ण नोंदी मिळून येणार नाही. तसेच विकास कामांमध्ये जर अनियमितता असेल तर त्या अनियमिततेच्या कामावर पडदा टाकून सदर प्रकरणे मार्गी लागली आहेत, असा कयास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पारडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांची जाळपोळ प्रकरणी नागरिकात उलटसुलट चर्चा आहे. अंधारात केले पण उजेडात आले, या म्हणीप्रमाणे जाळपोळ करणारा आरोपी या परिसरातील असल्याचे लोकचर्चेद्वारे चर्चिले जात आहे. मात्र, सदर प्रकरणाचा तपास कासवाच्या संथ गतीने सुरू असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून मोकाट अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. 

~(क्रमशः)

  Post Views:   507



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी