ब्रह्मपुरी पोलिसांची गडचिरोलीत धडक कारवाई; केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
६१ किलो तांब्यासह टाटा एस वाहन जप्त; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
ब्रह्मपुरी येथील एका गोदामातून महागडी केबल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. गडचिरोली येथे धाड टाकून पोलिसांनी ६१ किलो तांब्यासह चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
विद्यानगर, ब्रह्मपुरी येथील रहिवासी वैभव विनोद संगमवार (वय २८) यांच्या गोदामाच्या खुल्या जागेत १५०० मीटर लांबीची '१९ कोर ४ एमएम राउंड केबल' ठेवली होती. १० जानेवारी २०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यापैकी ४०० मीटर केबल लांबविली. याप्रकरणी संगमवार यांनी ११ जानेवारी रोजी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.
पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, नागेश नागा कुंभारे (३५, रा. गडचिरोली) याने एका महिला साथीदारासह ही चोरी केली आहे. चोरलेली केबल जाळून त्यातील तांबे काढले असून ते नागेशच्या गडचिरोली येथील घरात लपवून ठेवल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने पथक तयार करून गडचिरोलीत आरोपीच्या घराची झडती घेतली. यावेळी आरोपीच्या घरात ६१ किलो जाळलेले तांबे (किंमत अंदाजे ६१,००० रुपये) आढळून आले. पोलिसांनी तांब्यासह चोरीसाठी वापरलेले टाटा एस वाहन क्र. MH 33 T 0873 हे वाहनही जप्त केले आहे.
ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दारावसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सपोनि मनोज खडसे, पो.ह. मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ठ रंगारी, निलेश तुमसरे, प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि महिला पोलीस अंमलदार शिवाली कांबळे यांचा समावेश होता. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकेश गजबे करत आहेत.