ब्रम्हपुरी पोलिसांचा मोठा दणका! बार फोडणाऱ्या आंतरतालुका भामट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

   

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
            शहर व परिसरात सलग दोन बार फोडून पोलिसांना उघड आव्हान देणाऱ्या अट्टल चोरांच्या टोळीचा ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ अट्टल आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेली विदेशी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली तीन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
          १७ जुलै २०२६ रोजी विद्यानगर, ब्रम्हपुरी येथील रहिवासी शंतनु प्रकाशराव बगमारे यांच्या मौजा अड्याळ येथील बारचे शटर वाकवून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. बारमधील १,६६,८०५ रुपयांची विदेशी दारू व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपास सुरू असताना आरोपींनी चलाखी दाखवत सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून चोरी केल्याचे समोर आले.
            पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच अवघ्या आठ दिवसांच्या आत चोरांनी पोलिसांना पुन्हा आव्हान दिले. खरकाडा (ता. ब्रम्हपुरी) येथील अमीत दादाजी बनकर यांच्या बारचे मागील शटर वाकवून २,१३,२२७ रुपयांची विदेशी दारू व इतर साहित्यावर डल्ला मारला.
             सलग घडलेल्या या दोन्ही चोऱ्या एकाच टोळीने केल्याचा संशय पोलिसांना आला. ठाणेदार पो.नि. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, तर्कशक्ती आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचे नेटवर्क उद्ध्वस्त करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेले आरोपी मध्ये सौरभ अनिल वाघाडे (वय २६, रा. बामणी, ता. नागभिड), जगदिश दिपक शेंन्द्रे (वय २५, रा. राममंदीर चौक, नागभिड), अभिषेक अशोक अलोने (वय २६, रा. कुनघाडाचक, ता. नागभिड) व विशाल दिवाकर ठाकरे (वय २३, रा. मांगली अरब, ता. नागभिड) यांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पांढऱ्या रंगाची बोलेरो (MH 29 AR 5844) - किंमत रु. ५,००,०००/-, निळ्या रंगाची बलेनो कार (MH 33 AD 1114) - किंमत रु. ७,००,०००/-, एस-प्रेसो कार (MH 34 VY 7447) - किंमत रु. ४,००,०००/- यांच्यासह चोरीस गेलेली विदेशी दारू व इतर साहित्य असे एकूण किंमत ११,०४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील दोन मोठे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करत आहेत.
        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि पो.नि. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोज खडसे, पो.हवा. मुकेश गजबे, मिलींद नैताम, तसेच पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार व बशिष्ट रंगारी यांनी ही उत्कृष्ट कारवाई पार पाडली.

  Post Views:   2105


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी