तलावातील 'त्या' गूढ पिवळ्या प्रकाशाचे रहस्य अखेर उलगडले! ब्रह्मपुरी पोलीस अन् SDRF ची शोधमोहीम फत्ते; तलावाच्या तळाशी सापडला LED चार्जेबल लाईट
ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रुपाळा मेंढा (आकापूर) येथील छोट्या तलावातील पाण्यावर मागील काही दिवसांपासून दर मिनिटाला लुकलूकणाऱ्या पिवळसर प्रकाशाने संपूर्ण परिसरात मोठे गूढ निर्माण केले होते. कौतुक, आश्चर्य आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण करणाऱ्या या घटनेवर 'ब्रह्मपुरी समाचार' ने प्राधान्याने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत पोलीस व आपत्ती व्यवस्थापन दलाने (SDRF) राबवलेल्या शोधमोहिमेत या रहस्यामागचे मूळ कारण समोर आले असून तलावाच्या तळाशी एक 'LED चार्जेबल लाईट' ब्लिंक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रुपाळा मेंढा येथील तलावात रात्रीच्या वेळी दिसणारा पिवळा प्रकाश पाहण्यासाठी परिसरातील ६ ते ७ गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत 'ब्रह्मपुरी समाचार' मध्ये बातमी प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम, पोलीस अंमलदार शुभम लेडांगे, अमोल लोनबले आणि अभिषेक आगाशे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तलावाच्या तळाशी काय आहे हे शोधण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) ४ जणांच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांनी तलावाच्या पाण्यात उतरून सखोल शोधमोहीम राबवली.
शोधमोहिमे दरम्यान पथकाला तलावाच्या मध्यभागी तळाशी एक 'LED चार्जेबल लाईट' (ब्लिंकिंग लाईट) चालू स्थितीत मिळून आला. हा लाईट पाण्यात पडून किंवा कोणीतरी टाकल्यामुळे तो दर मिनिटाला पिवळ्या रंगात लुकलूकत असल्याचे उघड झाले. पोलीस आणि SDRF च्या या संयुक्त कामगिरीमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये निर्माण झालेले गूढ, भीती आणि तर्कवितर्क आता पूर्णपणे थांबले आहेत. पोलीस प्रशासन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा अलौकिक गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून 'ब्रह्मपुरी समाचार'च्या सजग पत्रकारितेमुळे आणि पोलीस व SDRF च्या तत्परतेमुळे या रहस्याचा अखेर सुखद आणि सुरक्षित शेवट झाला आहे.
तलावातील गुढ प्रकाशप्रकरणी 'अंनिस'चा वैज्ञानिक दावा ठरला खरा!
रुपाळा मेंढा (आकापूर) येथील तलावातील पिवळसर प्रकाशाला दैवी प्रकोप अथवा चमत्कार न मानता त्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ठामपणे सांगितले होते. पाण्याखाली एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण असण्याची दाट शक्यता अंनिसचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी सोशल मीडियाद्वारे वर्तवत प्रशासनाकडे तातडीने तपासाची मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेत SDRF आणि पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता, तलावाच्या तळाशी ब्लिंक होणारा 'LED चार्जेबल लाईट' मिळून आला. यामुळे अंधश्रद्धेला फाटा देत अंनिसने केलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दावा अखेर शंभर टक्के खरा ठरला आहे.