ब्रह्मपुरीतील पेठवार्डमध्ये दुर्मिळ ‘खवल्या मांजर’ आढळले; वनविभाग व वन्यजीवप्रेमींच्या सतर्कतेमुळे सुरक्षित अधिवासात सुटका

   

ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
            तालुक्यातील पेठवार्ड येथील रहिवासी नामदेवजी उरकुडे यांच्या घरी सोमवारी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास एक दुर्मिळ 'खवल्या मांजर' (पँगोलिन) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, वनविभाग आणि स्थानिक वन्यजीवप्रेमींच्या तत्परतेमुळे या दुर्मिळ प्राण्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन त्याला जीवनदान देण्यात यश आले आहे.
          खवल्या मांजर हा जगातील अत्यंत दुर्मिळ आणि एकमेव असा सस्तन प्राणी आहे, ज्याच्या शरीरावर कठीण खवले असतात. नावामध्ये 'मांजर' असले तरी याचा मांजराशी किंवा मांजराच्या प्रजातीशी काहीही संबंध नाही. उरकुडे यांच्या घरी खवल्या मांजर असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीवप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 'नेचर एन्व्हायर्नमेंट अँड वाइल्डलाईफ ऑर्गनायझेशन' (NEWO) च्या सहकार्याने अत्यंत कौशल्याने बचाव मोहीम राबवून या प्राण्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले. या बचाव मोहिमेत वन्यजीवप्रेमी पंकज माकोडे, आरएफओ अरुण कन्नमवार, बायोलॉजिस्ट राकेश आहुजा, बीट गार्ड पंकज चुन्हे तसेच सर्पमित्र अश्विन उपासे यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. 
          खवल्या मांजर हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार खवल्या मांजराला 'अनुसूची १' अंतर्गत वाघ-सिंहाप्रमाणेच सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे. याची शिकार किंवा विक्री करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र अपराध आहे. त्यामुळे कायद्यांतर्गत अत्यंत दुर्मिळ आणि उच्च दर्जाचे संरक्षण असलेला प्राणी आहे. या प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर संरक्षणासाठी कठीण 'केराटीन' नावाच्या प्रथिनापासून बनलेले खवले असतात. संपूर्ण शरीर खवल्यांनी आच्छादलेला हा जगातील एकमेव सस्तन प्राणी मानला जातो. हा प्राणी प्रामुख्याने निशाचर (रात्री फिरणारा) असून दिवसा पोकळ झाडे किंवा जमिनीतील बिळांमध्ये वास्तव्य करतो. याचे मुख्य अन्न मुंग्या आणि वाळवी हे आहे. आपल्या लांब आणि चिकट जिभेच्या साहाय्याने तो अन्न शोधतो. खवल्या मांजर वर्षाला सुमारे ७ ते ८ कोटी कीटक-वाळवी खाते. त्यामुळे पिकांची आणि झाडांची वाळवीपासून बचत होते. म्हणूनच याला ‘नैसर्गिक पेस्ट कंट्रोलर’ किंवा ‘शेतकऱ्याचा मित्र’ म्हटले जाते. पर्यावरणातील कीटकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवून जैविक समतोल राखण्यात या प्राण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.धोका जाणवताच हा प्राणी स्वतःचे शरीर एखाद्या फुटबॉल किंवा चेंडूसारखे गोल गुंडाळून घेतो. त्यामुळे शिकारी प्राण्यांना किंवा हिंस्त्र जनावरांना याच्यावर हल्ला करणे अशक्य होते. 
         "खवल्या मांजर किंवा इतर कोणताही दुर्मिळ वन्यप्राणी नागरी वस्तीत आढळल्यास त्याला घाबरून न जाता अथवा कोणतीही इजा न पोहोचवता, तात्काळ वनविभागाशी किंवा स्थानिक वन्यजीव संरक्षण संस्थांशी संपर्क साधावा," असे आवाहन ब्रह्मपुरी येथील पर्यावरणप्रेमी पंकज माकोडे यांनी केले आहे.

  Post Views:   1060


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी