ब्रम्हपुरीत काँग्रेसमध्ये ‘नाराजी नाट्य’: सभापती निवडीवर ६ नगरसेवकांचा बहिष्कार, राजकीय भूकंप येणार?
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी
ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली असली, तरी या निवडीने सत्ताधारी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणला आहे. पाचही सभापतींची अविरोध निवड झाली असली, तरी पक्षाच्या २३ पैकी ६ नगरसेवकांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
२० जानेवारी रोजी पार पडलेल्या विशेष सभेत काँग्रेसच्या पाचही सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असून २३ नगरसेवक सोबतीला आहेत. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी २३ पैकी केवळ १५ नगरसेवक उपस्थित होते. स्वतः नवनिर्वाचित पाणी पुरवठा सभापतींसह सहा नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने "विजयाचा आनंद की नाराजीचा सूर?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनुपस्थित राहणारे ‘ते’ सहा नगरसेवक कोण?
सभेला दांडी मारणाऱ्यांमध्ये सतिश हुमने (नवनिर्वाचित पाणी पुरवठा समिती सभापती), अनुकूल शेंडे, प्रकाश खोब्रागडे, गीता मेश्राम, पुष्पलता पोपटे, व हेमलता सिंहगडे प्रमुख नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सतिश हुमने यांची सभापती म्हणून निवड होऊनही त्यांनी सभेला अनुपस्थित राहणे, हे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. पक्षश्रेष्ठींनी या नगरसेवकांना काही आश्वासने दिली होती. मात्र, सभापती निवडीच्या वेळी या शब्दाचे पालन झाले नसल्याचा आरोप या गटाकडून केला जात आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर या गटातील एका सदस्याने सांगितले की, "पक्षाने दिलेल्या शब्दाला जागले नाही, म्हणूनच आम्ही आमची नाराजी या माध्यमातून व्यक्त केली आहे."
भविष्यात राजीनामा सत्र?
या ६ नगरसेवकांच्या बंडखोर पवित्र्यामुळे ब्रम्हपुरी काँग्रेसमध्ये भविष्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही अनुपस्थिती केवळ नाराजी नसून, एका मोठ्या राजकीय संघर्षाची नांदी मानली जात आहे. शहरात अशी चर्चा सुरू आहे की, जर पक्षश्रेष्ठींनी या नाराजीची वेळीच दखल घेतली नाही, तर लवकरच 'राजीनामा सत्र' सुरू होऊ शकते. ब्रम्हपुरीच्या या राजकीय नाट्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, आता काँग्रेसचे स्थानिक नेते ही 'डॅमेज कंट्रोल' कशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.