'मरेखट' काढण्याच्या नावाखाली भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेल्या गृहिणीला तब्बल ९८ हजार रुपयांना गंडा
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :
घरात चाललेला आजारपण, अडी - अडचणी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भोंदूबाबांनी लोकांना लुटल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. अशीच एक संतापजनक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे उघडकीस आली आहे. 'तुमच्या नवऱ्याला आणि घराला मरेखट लागली आहे' अशी भीती दाखवून एका भोंदूबाबाने एका महिलेला तब्बल ९८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पीडित महिला संध्या मनोहर मशाखेत्री (वय ३५, रा. गांगलवाडी) यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भोंदूबाबाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास गांगलवाडी गावात दोन अनोळखी व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आल्या होत्या. त्यातील एका व्यक्तीने अंगात पांढरा शर्ट, काळी लुंगी, डोक्यावर लाल फेटा आणि हातात मोरपिसाचा झाडू धरला होता. पीडित महिलेने त्याला १० रुपये भिक्षा दिली. त्यानंतर त्या भोंदूबाबाने घरात कोण कोण आहे, अशी विचारपूस केली. नवरा दारू पिऊन झोपला आहे आणि मुले शाळेत गेली आहेत हे कळताच त्याने आपला जाळ फेकायला सुरुवात केली. तुमच्या घरात किडा लागला आहे, पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने महिलेकडून पाणी, अगरबत्ती, तांदूळ आणि धागा मागवून घेतला. काही भोंदूगिरीचे प्रकार करून त्याने महिलेकडून पूजा आणि उपायांच्या नावाखाली पहिल्याच दिवशी रोख ८,००० रुपये लाटले.
एवढ्यावरच तो भोंदूबाबा थांबला नाही. त्याच दिवशी रात्री त्याने मोबाईलवरून संपर्क साधून महिलेला अधिक घाबरवले. "तुमच्या नवऱ्याला 'मरेखट' लागली आहे. ती काढण्यासाठी 'अबुस बुत्ती' नावाचे महागडे औषध लागेल," असे सांगितले. हे औषध ब्रम्हपुरी येथील वडसा रोडवरील दुकानात मिळेल असे सांगून दुकानदाराचा नंबर दिला. भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेने त्या दुकानात जाऊन दोन टप्प्यांत (२० आणि २७ सप्टेंबर रोजी) तब्बल ३८,११५ रुपयांची औषधे विकत घेतली. औषधे देऊनही समाधान न झालेल्या या भोंदूबाबाने १ ऑक्टोबर रोजी पुन्हा फोन केला. घराची संपूर्ण पूजा करण्यासाठी सोने आणि ५५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. घाबरलेल्या महिलेने तळोधी गावातील पाण्याच्या टाकीजवळ जाऊन त्या बाबाला ३० हजार रुपये रोख आणि १२ ग्रॅम सोन्याचे दागिने (दोन अंगठ्या व बिर्या, किंमत सुमारे ६० हजार रुपये) दिले. मी दर्ग्यात जाऊन पूजा करतो आणि संध्याकाळी सोने-पैसे परत करतो. तोपर्यंत घरात खड्डा खोदून ठेव,असे सांगून तो भोंदूबाबा आपल्या मोटरसायकलवरून निघून गेला. मात्र, संध्याकाळ झाली तरी बाबा परत आलाच नाही आणि त्याचा फोनही बंद येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अंगावर पांढरा फुलशर्ट, काळी लुंगी, डोक्यावर लाल फेटा असणाऱ्या या संशयित भोंदूबाबाचा पोलीस आता शोध घेत आहेत.