वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मानव वन्यजीव संघर्षामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना १६ सप्टेंबर २०२५ ला दुपारी ४.३० वाजता दरम्यान घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील रहिवासी सुनिल उर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत वय ३२ वर्ष हे गुरे चराईचा काम करतात. उत्तर वनपरिक्षेत्रातील अंतर्गत उपक्षेत्र ब्रम्हपुरीतील सायगाटा बीट मधील कक्ष क्रमांक ८३२ परिसरातील लाखापूर जंगलातून गुरे चराई करून परतत असतांना, अचानक वाघाने प्रमोद राऊत त्यांच्यावर हल्ला चढविला. वाघाने केलेल्या हल्ल्यात प्रमोद राऊत हे ठार झाले. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकर्यांनी वनविभागाच्या अधिकार्याना सदर घटनेची माहिती दिली. माहिती प्राप्त होताच, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकार्यांनी प्रमोद राऊत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविला. उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड यांनी मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच इतर मदत लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. सदर मानव वन्य प्राणी संघर्ष समस्या सोडविण्यासाठी वन विभागाने पावले उचलण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.