सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत एल.एम.बी.पब्लिक स्कुलची आदिती ठाकूर तालुक्यात प्रथम
ने.हि.शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
ब्रम्हपुरी/का.प्र.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल केंद्रिय मंडळाने मंगळवारला ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केला. परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ या काळात झाली. निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यात पूर्व विदर्भात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई भैया शिक्षण संस्थेतंर्गत येणार्या एल.एम.बी. पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आदिती ठाकूर हिने ९६.६० टक्के गुण संपादित करीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आर्या पोफले ह्या विद्यार्थीनीने ९६ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर अन्वीता लभाने ह्या विद्यार्थीनीने ९५.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळविले. तसेच एल.एम.बी.पब्लिक स्कूलचा सार्थक शेंडे व ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल, ब्रम्हपुरीची विद्यार्थीनी स्पर्शीका खोब्रागडे यांनी ९३ टक्के गुण प्राप्त करीत चतुर्थ स्थानी येण्याचा मान पटकाविला. तर एल.एम.बी.पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आस्था मेश्राम, अक्षरा शेंडे, ओजस घोनमोडे यांनी प्रत्येकी ९२.२० टक्के गुण संपादित करून तालुक्यातून पाचवे स्थान गाठले.
एल.एम.बी.पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी आदिती ठाकूर हिच्या या कामगीरीमुळे ब्रम्हपुरी तालुक्याच्या व नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम गुण प्राप्तीमुळे नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या, एल़.एम.बी.पब्लिक स्कूलच्या संचालिका आशिता भैया, प्राचार्य कादिर कुरेशी यांनी अभिनंदन केले.