तोरगाव बुज येथील गोसेखुर्दच्या नहरावरील २४ कृषी पंपांची धाडसी चोरी
ब्रह्मपुरी / प्रतिनिधी :
संपूर्ण देशात ‘अल निनो’च्या संकटाने थैमान घातल्यामुळे पर्जन्यमान अत्यंत कमी प्रमाणात झाले. वेळेवर पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील धान पीक ऐन धोक्यात आले होते. शेतकऱ्यांसमोर आपल्या हाताशी आलेले पिक कसे जगवावे, हा मोठा प्रश्न होता. अशा संकटकाळात ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (बुज) येथील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्दचा नहर वरदान ठरेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, कालव्याची पातळ पातळी खोल आणि शेतजमीन उंचावर असल्याने प्रवाही सिंचनाद्वारे शेतात पाणी नेणे अशक्य होते. यावर मात करण्यासाठी तोरगाव (बुज) येथील शेतकी बळकट करणाऱ्या जिद्दी शेतकऱ्यांनी गोसेखुर्द कॅनलच्या पाळीवर रीतसर परवानगी घेऊन ३ एचपी (HP) व ५ एचपीचे कृषीपंप बसवले. अतोनात मेहनत आणि पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी कसेबसे आपले धान पीक वाचवले आणि आता धान पीक काढणी व मळणीच्या अंतिम टप्प्यात आले होते. अशातच, या परिसरातील अज्ञात चोरट्यांनी घातलेला घाव शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. कॅनलवर बसवलेले तब्बल २४ कृषी पंप कृषी पंप, त्यांचे जोडलेले पाईप आणि विद्युत वायर्स अज्ञात चोरट्यांनी कापून रात्रीच्या सुमारास लांबवले आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाशी आणि दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करून बळीराजाने उभे केलेले पीक अखेर वाचवले खरे, परंतु ऐन काढणीच्या तोंडावर झालेल्या या कृषी पंप चोरीच्या सत्रामुळे गरीब शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखा पळवला गेला आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना या चोरीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. एका बाजूला पिकाला वाचवण्यासाठी धडपडणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणारे समाजकंटक, या वास्तवाने संपूर्ण समाजात हळहळ व्यक्त होत असून हा प्रकार मनाला अंतर्मुख करणारा आहे.
वृत्त लिहिपर्यंत या घटनेची कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, परंतु या अमानुष चोरीमुळे तोरगाव (बुज) परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा आणि गरीब शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी आर्त हाक आता तोरगाव (बुज) येथील शेतकरी देत आहेत.