कोट्यवधी रुपयांचा धान खरेदी घोटाळा: ब्रम्हपुरीच्या व्यापाऱ्यांना १.२९ कोटींचा गंडा; देसाईगंजच्या दलालासह भंडारा येथील राईस मिल मालकावर गुन्हा दाखल!

   


  • 'केएमसी राईस इंडस्ट्री'मध्ये धान पाठवून अडकली कोट्यवधींची रक्कम; पैसे मागितल्यावर व्यापाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
             जास्त भावाचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करून स्थानिक धान व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार ब्रम्हपुरी येथे उघडकीस आला आहे. देसाईगंज येथील एका धान्य दलालाने भंडारा येथील 'केएमसी राईस इंडस्ट्री'च्या मालकांशी संगनमत करून अ-हेरनवरगाव (ता. ब्रम्हपुरी) येथील तीन मोठ्या धान्य व्यापाऱ्यांचे तब्बल २ कोटी १५ लाख ४५ हजार ३७७ रुपये हडप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य तक्रारदार नंदकिशोर नामदेव वैद्य (रा. अ-हेरनवरगाव) यांच्या लेखी रिपोर्टवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१६(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         तक्रारदार नंदकिशोर वैद्य हे अ-हेरनवरगाव येथे आपल्या पत्नीच्या नावाने 'साई कृषी केंद्र' चालवून धान खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. देसाईगंज येथील 'तेजस ट्रेडर्स'चे मालक व दलाल सुनील टोलाराम रामनानी (वय ४५) यांच्याशी वैद्य यांचे मागील ७-८ वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. सन २०२५ मध्ये सुनील रामनानी याने ब्रम्हपुरीपेक्षा जास्त भाव मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि शिंगोरी (भंडारा) येथील कुरेशी ब्रदर्स यांच्या 'केएमसी (KMC) ग्रेन मिलिंग अँड प्रोसेसिंग युनिट LLP' मध्ये माल पाठवण्यास सांगितले. सुरुवातीला काही महिने व्यवहार सुरळीत करून रामनानीने वैद्य यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
            यावर्षी जून महिन्यात रामनानी याने पुन्हा माल पाठवण्यास सांगितले. मात्र, नेहमी १५ दिवसांत मिळणारे पेमेंट यावेळेस २ महिन्यांच्या साईटवर (मुदतीवर) मिळेल असा मेसेज कंपनीने पाठवल्याने नंदकिशोर वैद्य यांना संशय आला. त्यांनी रामनानीकडे विचारणा केली असता, "तू काळजी करू नको, पैशांची पूर्ण हमी माझी आहे. केएमसीचा ५० टक्के तांदूळ मीच विकतो, त्यामुळे तिथली सगळी एबीसीडी मला ठाऊक आहे," असा शब्द रामनानीने दिला. दलालाच्या या शब्दावर विश्वास ठेवून वैद्य यांनी १० जून २०२५ ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण २२ ट्रक धान (६००१.०५ क्विंटल) केएमसी मिलला पाठवले. ज्याची एकूण रक्कम १,२९,९०,०३२/- रुपये (एक कोटी एकोणतीस लक्ष नव्वद हजार बत्तीस रुपये) होती.
           मुदत संपल्यानंतरही पैसे न आल्याने व्यापाऱ्यांनी तगादा लावला. सुरुवातीला बँक लोनचे कारण सांगून टाळाटाळ करण्यात आली. १० सप्टेंबर २०२५ रोजी नंदकिशोर वैद्य हे अन्य एक व्यापारी विनोद कावळे यांच्यासह सुनील रामनानीच्या देसाईगंज येथील ऑफिसमध्ये गेले. तिथे हिशोब मागितला असता रामनानीने रंग बदलला आणि "तुझा माल मी विकत घेतला काय? आता जास्त विचारले तर अंजाम बेकार होईल," अशी धमकी दिली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी थेट भंडारा येथील मिल गाठून संचालक मतीन अहमद गणी अहमद कुरेशी यांची भेट घेतली. त्यांनीही महिनाभराची मुदत मागितली. परंतु, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा पैशांची विचारणा केली असता मतीन कुरेशी याने अत्यंत उद्धटपणे, "पुन्हा तू माझ्या मिलला धान दे, मिल चालू राहील तरच तुझे जुने पैसे जिवंत राहतील. अन्यथा वाट बघत राहा, किंवा तुला जे जमेल ते कर, तेरे को जो उखाडणा है उखाड ले!" असे म्हणून व्यापाऱ्यांना हाकलून लावले.
            या संपूर्ण प्रकरणात दलाल सुनील रामनानी आणि मिल मालक कुरेशी यांच्यात मोठी गुप्त युती (साटेलोटे) असल्याचे उघड झाले आहे. २८ मार्च २०२६ रोजी व्यापाऱ्यांच्या 'KMC RECOVERY GROUP' या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक ७/१२ चा उतारा पोस्ट झाला. मतीन कुरेशी यांचा मुलगा शाहबाज उर्फ बंटी कुरेशी याने मौजा पावडदवणा (ता. मौदा, जि. नागपूर) येथील कोट्यवधी रुपयांची शेतजमीन दलाल सुनील रामनानीच्या नावे करून दिल्याचे त्या उताऱ्यावरून स्पष्ट झाले.
           २९ मार्च रोजी व्यापाऱ्यांनी देसाईगंज येथील ट्रॅक्टर शोरूममध्ये रामनानीला गाठून हा ७/१२ चा उतारा दाखवला. त्यावर रामनानीने जमीन लिहून घेतल्याचे मान्य केले, पण अत्यंत अश्लील भाषेत व्यापाऱ्यांना धमकावले. तसेच तिथल्या एका स्थानिक राजकारण्याला बोलावून "कुरेशीचे मोठ्या गुंडांसोबत संबंध आहेत, त्याच्या नादाला लागू नका," अशी धमकीवजा तंबी व्यापाऱ्यांना देण्यात आली.
           ८ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदार केएमसी मिलवर गेले असता, तिथे त्यांच्यासारखेच फसवणूक झालेले महाराष्ट्रातील विविध भागांतील अंदाजे ८० व्यापारी हजर होते. तिथल्या संचालकांनी स्पष्ट सांगितले की, आता तुमची थकीत रक्कम देण्याची आमची लायकी उरलेली नाही. अ-हेरनवरगाव येथील फसवणूक झालेले एकूण व्यापाऱ्यांमध्ये नंदकिशोर नामदेव वैद्य यांचे २२ ट्रक, ६००१.०५ क्विंटल माल अंदाजे किंमत रु. १,२९,९०,०३२/-, विनोद वामनराव कावळे यांचे १३ ट्रक, १९४३.७० क्विंटल माल, अंदाजे किंमत रु. ७५,७०,८१६/- व रामदास हरिभाऊ जिभकाटे ०२ ट्रक, ४८१.३५ क्विंटल माल अंदाजे किंमत रु. १०,४४,५२९/- असे एकूण ३७ ट्रकमध्ये ८४२६.१० क्विंटल माल किंमत २,१५,४५,३७७/- रुपये हडप केले. 
      दलाल आणि मिल चालकांनी मिळून पद्धतशीरपणे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारल्याचे यावरून स्पष्ट होते. ब्रम्हपुरी पोलिसांनी या संदर्भातील तक्रार दाखल करून घेतली असून, आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. या मोठ्या धान घोटाळ्याचे धागेदोरे कुठेकुठे पसरले आहेत आणि इतर किती व्यापाऱ्यांना यात फसवले गेले आहे, याचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

  Post Views:   1454


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी