गुरुदेव भक्त, समाजसेवक व शिक्षणप्रेमी डॉ. विठ्ठलरावजी बोरकुटे यांचे निधन
नवेगाव (पांडव) : गुरुदेव भक्त, समाजसेवक, शिक्षणप्रेमी व विविध सामाजिक उपक्रमांचे मार्गदर्शक डॉ. श्री. विठ्ठलरावजी कवडुजी बोरकुटे यांचे दीर्घ आजाराने गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.४८ वाजता वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नवेगाव (पांडव) परिसरासह सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. विठ्ठलरावजी बोरकुटे हे गुरुदेव भक्त म्हणून परिचित होते. त्यांनी आयुष्यभर समाजहिताची जपणूक करत विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक धार्मिक, सांस्कृतिक व जनहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्याची छाप अनेकांच्या मनावर कायम राहणार असून त्यांच्या निधनामुळे समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व असंख्य हितचिंतक असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नवेगाव (पांडव) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. विठ्ठलरावजी बोरकुटे यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.