गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याने सर्वत्र खळबळ : जलसंपदाच्या माजी मुख्य अभियंत्यासह ४ बड्या अधिकाऱ्यांवर ACB कडून गुन्हा दाखल!
ब्रम्हपुरी / प्रतिनिधी :
गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांतर्गत ब्रम्हपुरी येथील उजव्या मुख्य कालव्यावरील कामात कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल आणि पदाचा गैरवापर करून कंत्राटदाराला कोट्यवधींचा गैरलाभा मिळवून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार फर्मच्या भागीदाराविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल मोहनरेड्डी जिट्टावार यांनी सरकारतर्फे ही अधिकृत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिका (क्र. ९२/२०१२ आणि ८३/२०१२) च्या आदेशान्वये गृह विभाग आणि अँटी करप्शन ब्युरो मुख्यालयाच्या निर्देशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या (VIDC) प्रकल्पांमधील अनियमिततेची उघड चौकशी आदेशित करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी व पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. गोसीखुर्द उजवा मुख्य कालवा विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत सा.क्र. ६३९५० मी. वरील डी-७ वितरीकेमधील मातीकाम व बांधकामाची रु. १२,६३,५०,१४४/- (१२.६३ कोटी) मूल्याची निविदा जून २००९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदेसाठी ५ कंत्राटदारांनी अर्ज केले होते. त्यापैकी मे. सुमेधा अर्थमुव्हर्स कं. अँड सुवर्णा इंटरप्रायजेस, पुणे (जे.व्ही.) या फर्मला पात्र ठरवून काम देण्यात आले. मात्र, चौकशीदरम्यान या फर्मने सादर केलेली सर्वच्या सर्व ४ पुर्वानुभव प्रमाणपत्रे पूर्णतः बनावट आणि बोगस असल्याचे निष्पन्न झाले. धोम बलकवाडी प्रोजेक्ट, वाई (सातारा) या कार्यालयाने असे कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचे आणि काम दिले नसल्याचे तत्कालीन व विद्यमान कार्यकारी अभियंत्यांनी बयानात स्पष्ट केले. मृद व जलसंधारण विभाग, सातारा (येणपे ता. कराड काम) या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी आपली नसल्याचे व प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगितले. सां.बां. (दक्षिण) विभाग, पुणे (गाढले ता. मुळशी रस्ता काम) या संबंधित कंत्राटदाराला असे कोणतेही काम दिले नसल्याचे चौकशीत समोर आले. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नागपूर (नवी मुंबई जीआयएस सबस्टेशन काम) या वरिष्ठ उपमहाप्रबंधकांनी सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे बयानात नमूद केले. या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे कंत्राटदार फर्मचे कुलमुखत्यार मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल यांनी शासनाची जाणीवपूर्वक फसवणूक करून हे कंत्राट मिळवले.
चौकशीत केवळ कंत्राटदारच नव्हे, तर जलसंपदा विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारीही दोषी आढळले आहेत. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार जे.व्ही. (Joint Venture) फर्मची नोंदणी निबंधक कार्यालयाकडे असणे आवश्यक होते. मात्र, उपनिबंधक भागीदारी संस्था पुणे यांच्याकडील तपासणीत या फर्मची कोणतीही नोंदणी आढळली नाही. बँक खाते व पॅन कार्ड नसतानाही विभागीय लेखाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले व देयके अदा केली. निविदेचे अद्ययावतीकरण करताना मूळ किमतीत **रु. ३०.३३ लक्ष** (व्हॅट व इन्शुरन्सच्या नावाखाली) नियमबाह्य आणि अवैध पद्धतीने वाढवून शासनाचे आर्थिक नुकसान करण्यात आले. जर निविदेचे नियमानुसार अद्ययावतीकरण केले असते तर आधिक्य ७.४० टक्के आले असते आणि ती मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवरील 'कार्यकारी समिती'कडे गेली असती. समितीला ही निविदा रद्द करण्याचा किंवा दर कमी करण्याचा अधिकार होता. मात्र, अधिकाऱ्यांनी संगनमत करून अनियमित अद्ययावतीकरण केले, ज्यामुळे आधिक्य ४.९४ टक्के दाखवून ते 'कार्यकारी संचालक' यांच्या स्तरावरच मंजूर करून कंत्राटदाराला बेकायदेशीर फायदा मिळवून देण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(ड), १३(२) (भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८) सह भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ अन्वये आरोपी सुधाकर घेंगारे, तत्कालीन विभागीय लेखाधिकारी, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग, ब्रम्हपुरी, संजय लक्ष्मण खोलापूरकर, तत्कालीन अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, विपाविम, नागपूर, सोपान रामराव सूर्यवंशी तत्कालीन मुख्य अभियंता, विपाविम, जलसंपदा विभाग, नागपूर, देवेंद्र परशुराम शिर्के तत्कालीन कार्यकारी संचालक, विपाविम, नागपूर, मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल कुलमुखत्यार व भागीदार, मे. सुवर्णा इंटरप्रायजेस, पुणे (रा. टिंगरे नगर, पुणे), मे. सुमेधा अर्थमुव्हर्स कंपनी, पुणे (भागीदारी फर्म), मे. सुवर्णा इंटरप्रायजेस, पुणे (भागीदारी फर्म) आरोपींवर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कंत्राटदार मनोजकुमार अब्रोल यांनी बनावट कागदपत्रे खरे म्हणून वापरून शासनाची शुद्ध फसवणूक केली. तर जलसंपदा विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, कंत्राटदाराशी संगनमत करून शासनाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. सदर गुन्ह्याचा मुख्य कालावधी दिनांक १५/०६/२००९ ते १८/०३/२०१० दरम्यानचा असून, गुन्ह्याचे घटनास्थळ कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग, ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर यांचे कार्यालय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत. सिंचन वर्तुळात या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.