भंडारा-गडचिरोली समृध्दी महामार्ग जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 आपल्यावरील होणार्‍या अन्यायाच्या विरोधात बाधित शेतकरी एकत्रित येऊन मोठ लढा उभारण्यासाठी विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागचे विश्राम गृह ब्रम्हपुरी येथे दिनांक ५ मे २०२५ रोजी शेतकर्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ.महेश कोपुलवार राज्य कार्याधक्ष अखिल भारतीय किसान सभा, डॉ.खुणे, प्रा तुळशीराम तलमले, आशिष शहारे, अशोक ठेंगरी उपस्थित होते. 
 शेतकर्‍यांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही. जो पर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तो पर्यंत अनेक आंदोलने करून आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी राहु, असे मुख्य मार्गदर्शक डॉ. महेश कोपुलवार कार्याध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार सदर महामार्ग तयार होत असल्याने मिळणारा मोबदला शेतकर्‍यांना अतिशय कमी असणार आहे रेकॉर्ड नुसार दोन पट असणार आहे. शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी या महामार्गाला वापरून सरकार शेतकर्‍यांना उध्वस्त करणार आहे. सदर महामार्ग भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयोगाचा नाही फक्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित २५ खाणींचा कच्चा माल इतर राज्यात नेण्यासाठी सदर द्रुतगती महामार्गाचा वापर सरकार करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर मार्गासाठी संपादित होणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत परंतु याचा फायदा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथील सामान्य जनतेला होणार नाही हे स्पष्ट आहे. 
 प्रसंगी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध लढा उभारण्यासाठी, आपल्या हक्क, अधिकारासाठी बाधित शेतकर्‍यांनी संघटित राहून लढा तीव्र करण्याचे आवाहन विनोद झोडगे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चुन्नीलाल मोटघरे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन गडे यांनी केले.

  Post Views:   40



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी