लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून मेंडकी येथील तरुणाची आत्महत्या

   

ब्रह्मपुरी/का. प्र.
              लग्न जुळत नसल्याच्या कारणातून सतत तणावात असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाने शेताजवळील झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना तुलानमेंढा येथे घडली. मनोज दामोदर भोयर वय ३० वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे.
             ब्रह्मपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता फिर्यादी राकेश दामोदर भोयर व त्याचा मोठा भाऊ मनोज दामोदर भोयर राहणार मेंडकी हे दोघेही घरी होते. कामानिमित्त धाकटा भाऊ राकेश हा दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी परतला असता, त्याला मोठा भाऊ मृत मनोज घरी दिसला नाही. मनोज नेहमीप्रमाणे शेतावर गेला असावा, असा अंदाज राकेशने वर्तवला होता. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत मनोज घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. राकेशने भावाचा शोध घेण्यासाठी शेताकडे धाव घेतली असता, 'तुलानमेंढा' रोडवरील एका सागाच्या झाडाला मनोज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
            प्राथमिक माहितीनुसार, मनोजचे लग्न जुळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. राकेश भोयर याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये (अकस्मात मृत्यू) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहेत.

  Post Views:   1493




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी