राष्ट्रीय चर्चासत्रात नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांनी केले नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व

   

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी):
स्थानिक नेवजाबाई हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथील मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांनी राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास चर्चासत्रात चंद्रपूर जिल्ह्यातून नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करत शाळेच्या शैक्षणिक लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
दिनांक २ ते ४ जानेवारी दरम्यान पेस सेंटर, नांद्राबाद, ता. खुलदाबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे हे राष्ट्रीय स्तरावरील शालेय नेतृत्व विकास चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राचे आयोजन महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MIEPA), छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले होते.
               या राष्ट्रीय चर्चासत्रास दिल्ली येथील निपा (NIPA) च्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच शिक्षण संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल साबळे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालिका डॉ. शैलजा दराडे, प्राचार्य डॉ. आर. डी. कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
              या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रातील ७२ निवडक मुख्याध्यापक, तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा व इतर केंद्रशासित प्रदेशांतील मिळून सुमारे ९० मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला. चर्चासत्रात शालेय नेतृत्व कौशल्ये, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती यावर सखोल व मार्गदर्शक चर्चा करण्यात आली.
             या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांनी आपल्या विद्यालयात राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता सुधारणा प्रक्रिया तसेच शाळा प्रशासनातील अनुभव राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडले.
“शाळेचे वैभव व शैक्षणिक कार्य राष्ट्रीय पातळीवर सादर करता आले, ही संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे,” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
                  सदर राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी MIEPA च्या संचालिका डॉ. चारुस्मिता मलिक, श्री. प्रकाश मुकुंद, प्राथमिक विभागाच्या सहसंचालिका श्रीमती भावना राजनोर तसेच ज्योती कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उल्लेखनीय यशाबद्दल नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय श्री. अशोकजी भैया तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांचे अभिनंदन केले. यासोबतच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला.
             मुख्याध्यापक श्री. के. एम. नाईक यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचा शैक्षणिक लौकिक अधिक उंचावला असून, संपूर्ण शाळा परिवारात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  Post Views:   173




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी