पेठवार्डातून एकाला बेकायदेशीर भरमार बंदुकीसह अटक
ब्रम्हपुरी:
शहरातील पेठवार्ड परिसरात एका घरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र (भरमार बंदूक) बाळगणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपये किमतीची जुनी भरमार बंदूक जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे हे आपल्या सहकाऱ्यांसह (पो.हवा. मुकेश गजबे, पो.हवा. मिलिंद नैताम, पो.अं. स्वप्नील पळसपगार, पो.अं. इर्शाद खान आणि पो.अं. प्रवीण भिवगडे) गस्तीवर होते. अवैध जनावरांची वाहतूक, प्रोव्ही रेड आणि जुगार रेडच्या कामासाठी पथक खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत असतानाच गुप्त बातमीदाराकडून एक खळबळजनक माहिती मिळाली. पेठवार्ड येथील रहिवासी रतनसिंग भुरानी हा आपल्या घरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगून असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने तत्काळ पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेबांना कळवून त्यांच्या आदेशानुसार कारवाईची पावले उचलली.
रेल्वे फाटक परिसराजवळ दोन स्वतंत्र पंचांना सोबत घेऊन पोलीस पथकाने थेट आरोपीच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी घरात प्रवेश करून पहिल्या खोलीतील बेडवर असलेल्या गादीची झडती घेतली असता, खाली लपवून ठेवलेली एक लाकडी-लोखंडी बनावटीची भरमार बंदूक मिळून आली. या बंदुकीवर '1853 ENFIELD' असे लिहिलेले असून, सोबत बारूद ठासण्यासाठी लागणारा ९५.५ सेमीचा लोखंडी रॉडही सापडला. अग्निशस्त्राबाबत परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळीच रीतसर जप्ती पंचनामा करून सुमारे १४१ सेमी लांबीची ही बंदूक जप्त केली.
या प्रकरणी आरोपी रतनसिंग मैताबसिंग भुरानी (वय ५६, व्यवसाय-मजुरी, रा. आरमोरी रोड, पेठवार्ड, ब्रम्हपुरी) याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला आणि जप्त मुद्देमालाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रम्हपुरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.