शेतकरी बांधवांनो लक्ष द्या! MSP चे पैसे थेट खात्यात हवेत? मग १५ दिवसांत पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम!
ब्रह्मपुरी :
किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमालाचे पैसे विहित मुदतीत थेट बँक खात्यात जमा व्हावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आगामी पणन हंगाम २०२६-२७ पासून सर्व शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे (पेमेंट्स) थेट त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्येच अदा केले जाणार आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने एनपीसीआय (NPCI) कडून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली होती. या प्राप्त माहितीनुसार, योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप आधार क्रमांकाशी जोडलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
आधार संलग्न नसलेल्या अशा सर्व शेतकऱ्यांची खरेदी केंद्रनिहाय यादी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. जिल्हा पणन अधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांनी तातडीने या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांची बँक खाती आधारशी लिंक करून घ्यावीत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया १५ दिवसांच्या आत प्राधान्याने पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे कडक आदेश उप सचिव प्रमोद पाटील यांनी दिले आहेत.
आगामी पणन हंगामात आपल्या शेतमालाची रक्कम मिळण्यात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी जोडलेली नाहीत, त्यांनी आपल्या संबंधित खरेदी केंद्राशी किंवा बँकेशी संपर्क साधून आपले खाते त्वरित आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.