शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून संताप; ब्रह्मपुरीत २ हजार विद्यार्थ्यांचा भव्य 'आक्रोश मोर्चा'!

   


  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठवले निवेदन
ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
           देशातील ढेपाळलेली शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील घोळ, शिक्षणाचे होत असलेले व्यापारीकरण आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई याविरोधात आज ब्रह्मपुरी शहरात असंतोषाचा ज्वालामुखी पेटून उठला. 'स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया' (शाखा ब्रह्मपुरी) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनआंदोलनाने केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांमधील अपयशावर कडक ताशेरे ओढले. या भव्य मोर्चात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानयांच्या तातडीच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी करण्यात आली.
              आंदोलनाची सुरुवात ऐतिहासिक हुतात्मा स्मारक येथून झाली. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आणि सरकारच्या विद्यार्थीविरोधी धोरणांचा निषेध करत सुमारे २ हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक रस्त्यावर उतरले. हुतात्मा स्मारकावरून निघालेला हा भव्य मोर्चा मुख्य बाजार चौक आणि ख्रिस्तानंद चौकामार्गे उपविभागीय अधिकारी (SDO) व तहसील कार्यालयावर धडकला.
संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिक्षण हक्क आणि सरकारच्या कारभाराविरोधातील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सरकार एका बाजूला 'विश्वगुरू' बनण्याच्या बाता मारत असताना, दुसऱ्या बाजूला देशातील मूळ शिक्षण व्यवस्था डबघाईस आणत असल्याचा थेट आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.
          उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम भारताचे राष्ट्रपती यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातून केंद्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अपयशाचा पाढा वाचण्यात आला. निवेदनातील प्रमुख मुद्दे व ताशेरे पुढीलप्रमाणे, यात खाजगी शिक्षण संस्थांना पाठीशी घालून सरकारी शिक्षण व्यवस्था बंद पाडण्याचा छुपा अजेंडा राबवला जात आहे. यामुळे सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण महागडे झाले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा आणि शिक्षकांचा मोठा अनुशेष आहे. समान शैक्षणिक संधी देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पेपर फुटी, निकालांमधील अनियमतता आणि वाढती बेरोजगारी यामुळे देशातील युवा वर्ग हवालदिल झाला असून केंद्रीय शिक्षण मंत्रालय यावर उपाय शोधण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशाच्या शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल घडवून आणणारे व पर्यावरणासाठी लढणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासन करत असून, या दडपशाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.
          तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत आंदोलनाच्या नेतृत्वाने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, कोणतीही खैरात नाही! विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. सरकारने तातडीने यात सुधारणा केली नाही, तर हे आंदोलन केवळ ब्रह्मपुरीपुरते मर्यादित न राहता देशभर पसरेल," असा इशारा यावेळी देण्यात आला.
            या जनआंदोलनाला शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि आम जनतेने उत्स्फूर्त व जाहीर पाठिंबा दर्शविला. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असतानाही अत्यंत लोकशाही, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध मार्गाने हा मोर्चा पार पडला. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत, ब्रह्मपुरीतील या भव्य मोर्चाने शिक्षण क्षेत्रातील आव्हानांकडे आणि सरकारच्या ढिसाळ कारभाराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तरी निद्रिस्त सरकार विद्यार्थ्यांच्या या जनआक्रोशाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  Post Views:   1200


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी