डॉ. विलास मैंद यांचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे; परमात्मा एक सेवक पतसंस्थेचा पलटवार
- स्वतःचा स्वार्थ साध्य न झाल्यानेच संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; अध्यक्ष दिलीप राऊत यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा
ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
ब्रम्हपुरी येथील 'परमात्मा एक सेवक सहकारी पतसंस्थे'वर डॉ. विलास मैंद यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन असून, संस्थेची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी हा जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचे स्पष्टीकरण संस्थेच्या संचालक मंडळाने दिले आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक आणि नियमानुसार सुरू असून, खोटे आरोप करणाऱ्या डॉ. मैंद यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अध्यक्ष दिलीप राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
संस्थेने डॉ. मैंद यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. यात
१) कर्ज मर्यादा नियमानुसारच : डॉ. मैंद यांनी ५ लाखांच्या कर्जवाटपावर आक्षेप घेतला होता. मात्र, संस्थेने स्पष्ट केले की, परिपत्रकानुसार पतसंस्थेची वैयक्तिक महत्तम कर्ज मर्यादा ४० लाख रुपयांपर्यंत असू शकते. तरीही संस्थेने सुरक्षिततेसाठी ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतच मर्यादित ठेवली आहे. ४ कोटींच्या वर ठेवी असलेल्या संस्थेत ५ लाखांचे कर्जवाटप ही कोणतीही अनियमितता नसून कायदेशीर प्रक्रिया आहे.
२) तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती वैध : तज्ज्ञ संचालक संतोषजी शेबे यांना 'माता कन्यका पतसंस्थे'चा संचालक पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे, तर घनश्यामजी सूर्यवंशी यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि संस्था स्थापनेतील योगदानामुळे 'स्वीकृत संचालक' म्हणून घेण्यात आले आहे. या नियुक्त्या पूर्णपणे अधिकृत आहेत.
३) वसुली अधिकाऱ्याचा मुद्दा : संस्थेमध्ये एन.पी.ए. (थकीत कर्ज) नसल्यामुळे कोणत्याही बाह्य वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. केवळ संस्थेच्याच एका कर्मचाऱ्याकडे कर्ज विभागाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संचालक मंडळाने डॉ. विलास मैंद यांच्या राजीनाम्याचे खरे कारण समोर आणले आहे. डॉ. मैंद यांच्या इमारतीत संस्था सुरू होती. सुरुवातीला ५ हजार असलेले भाडे दुसऱ्या वर्षी ७,५०० रुपये करण्यात आले. तिसऱ्या वर्षी त्यांनी थेट १५,००० रुपये भाडे आणि १ लाख रुपये 'पगडी' मागितली. ही मागणी संस्थेला परवडणारी नसल्याने कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. तसेच स्वतःला 'संस्थापक' पद मिळावे यासाठी त्यांचा आग्रह होता, जो संचालक मंडळाने फेटाळून लावला होता. स्वतःच्या इमारतीचे भाडे वाढवून मिळाले नाही आणि मनमानी कारभार करता आला नाही, म्हणूनच डॉ. मैंद यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी राजीनामा दिला. आता स्वतःचा स्वार्थ साध्य न झाल्यामुळे ते खोटे आरोप करून ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप संचालक मंडळाने केला आहे. कोणतीही शहानिशा न करता वृत्तपत्रात खोट्या बातम्या प्रसिद्ध करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी डॉ. विलास मैंद यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यावेळी अध्यक्ष दिलीप राऊत, उपाध्यक्ष गोविंदजी चट्टे, संचालक सुनील राखडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.