रस्त्यात सापडले हजारो रुपये अन् मोबाईल, पण पुढे जे घडलं ते वाचून तुम्हालाही प्रतीकचा अभिमान वाटेल!

   

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी :
             आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी युगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारी एक अत्यंत कौतुकास्पद घटना ब्रह्मपुरी तालुक्यात समोर आली आहे. रस्त्यात सापडलेली हजारो रुपयांची रोकड, मोबाईल व अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी न आपल्या स्वतः कडे ठेवण्याच्या मोहात न पडता थेट प्राचार्यांकडे सुपूर्द करून लोकमान्य टिळक जुनिअर कॉलेजच्या प्रतीक लांजेवार या विद्यार्थ्याने आपल्या इमानदारीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
               मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास शिक्षक गौतम खोब्रागडे हे ब्रह्मपुरी वरून अ-हेरनवरगाव येथे आपल्या शेतावर जात होते. यादरम्यान त्यांच्याजवळील एक प्लास्टिकची पिशवी अनावधानाने रस्त्यात खाली पडली. शेतावर पोहोचल्यानंतर फोन करण्यासाठी खिशात हात टाकला असता पिशवी गहाळ झाल्याचे खोब्रागडे यांच्या लक्षात आले. दरम्यान, पिंपळगाव भोसले येथून ब्रह्मपुरी येथील 'लोकमान्य टिळक जुनिअर कॉलेज'मध्ये इयत्ता ११ वीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक मधुकर लांजेवार हा नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असताना त्याला रस्त्यावर ती प्लास्टिकची पिशवी सापडली. पिशवी उघडून पाहिली असता त्यात एक मोबाईल, हजारो रुपयांची रोकड आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
             रस्त्यात सापडलेला मौल्यवान मोबाईल आणि मोठी रक्कम पाहूनही प्रतीकच्या मनात कोणताही स्वार्थ निर्माण झाला नाही. त्याने तत्परतेने ती पिशवी तशीच सुरक्षित ठेवून कॉलेज गाठले आणि कॉलेजचे प्राचार्य यांच्याकडे सुपूर्द केली. दुसरीकडे, पिशवी हरवल्यामुळे चिंतेत असलेल्या शिक्षक गौतम खोब्रागडे यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून आपल्या हरवलेल्या क्रमांकावर कॉल केला. प्राचार्यांनी तो कॉल स्वीकारून खोब्रागडे यांना तात्काळ कॉलेजमध्ये बोलावून घेतले आणि त्यांची पिशवी सर्व वस्तूंनिशी सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केली.
              विद्यार्थी प्रतीक लांजेवार याने दाखवलेल्या या अथांग प्रामाणिकपणाबद्दल आणि नैतिक मूल्यांबद्दल शिक्षक गौतम खोब्रागडे यांनी त्याचे मनापासून आभार मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खोब्रागडे यांनी प्रतीकच्या इमानदारीचा आदर करत त्याला १,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले. प्रतीकच्या या कौतुकास्पद कृत्यामुळे लोकमान्य टिळक जुनिअर कॉलेजसह पिंपळगाव भोसले व संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, इतर विद्यार्थ्यांसाठी त्याचा हा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे.

  Post Views:   2205


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी