स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही अधिकृत रस्ता नसलेले गावं

नदीपात्रातूनच करावा लागतो प्रवास
   

 ब्रम्हपुरी/महेश पिलारे
 भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष उलटले, देश विकसनशीलते कडून विकसीत झाला. परंतु ब्र्म्हपुरी तालुक्यातील एक गाव अजूनही विकासाच्या प्रवाहापासून काही अंतरावरच आहे. रस्ते, पाणी, वीज, आणि राहण्यासाठी पक्की घरे ही जरी विकसीत गावाची लक्षणे असली तरी यातील एक जरी सोय नसेल तर त्या गावाचा विकास झाला असे म्हणता येणार नाही. गावा-गावांना जोडणारा दुवा म्हणजे रस्ता होय, परंतु एखाद्या गावाला जाण्यासाठी अधिकृत रस्ताच नसेल तर.. याची कल्पनाच न केलेली बरी. असेच अधिकृत रस्ता नसलेले ब्रम्हपुरी तालुक्यातील गाव म्हणजे लाडज. या गावाला जाण्यासाठी अद्यापही कुठलाही अधिकृत रस्ता नाही. होय, हे वास्तव आहे लाडज या गावाचे. 
 ब्रम्हपुरी शहरापासून अंदाजे १४ कि.मी. अंतरावर लाडज हे गाव आहे. हे गाव वैनगंगा नदीच्या चहूबाजूंनी वेढलेल आहे. त्यामुळे या लाडज गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे येथील जमीन कसदार आहे. त्यामुळे लाडज, चिखलगाव, सुरबोडी, पिंपळगाव, सोंद्री येथील शेतकर्‍यांची ९६७ हेक्टर शेतजमीन आहे. सदर गावाला चहूबाजूंनी वैनगंगा नदीचा वेढा असल्यामुळे सदर गावात ये-जा करण्यासाठी पावसाळ्यात नावे शिवाय पर्याय नाही. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरच पर्यायी मार्ग म्हणून गावकरी पात्रातून आवागमण करतात. परंतु गावाला जाण्यासाठी अद्यापही अधिकृत रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात लाडज व चिखलगांव वासीयांना नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. 
 दरवर्षी पावसाळ्यात लाडज हे गाव वैनगंगेच्या पाण्याने वेढलेले असते. या पूर्वी नदी पात्रातून आवागमन करीत असताना अनेक ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या. या रस्त्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी लाडज व चिखलगांव वासीयांनी प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार केले. आंदोलनाचा पवित्रा उचलला, निवडणुकींवर बहिष्कार टाकला अन् शेवटी त्यांची हाक शासन दरबारी ऐकू गेली आणि चिखलगांव लाडज गावांना जोडणारा दुवा म्हणून पुल बांधकाम मंजूर झाला. 
 दोन वर्षाच्या कालावधी उलटून सुद्धा अद्यापही पुलाचे पूर्ण बांधकाम झाले नाही. त्यामुळे यंदाही लाडज-चिखलगांव येथील शेतकरी, ग्रामस्थ, शाळकरी मुले व रूग्णांना नदीपात्रातूनच जीवघेणा प्रवास करावा लागणार आहे. लाडज-चिखलगांव यांना जोडणारा दुवा म्हणून या पुलाच्या रस्त्याकडे पाहिले जात होते. परंतु पुलाच्या अपूर्ण कामामुळे अजूनही लाडज गावाला जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पुलाचे अपूर्ण अवस्थेतील बांधकाम पूर्ण करावे आणि लाडज-चिखलगांव वासीयांना अधिकृत रस्त्याची सोय करून द्यावी अशी मागणी लाडज-चिखलगांव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

  Post Views:   813



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी