विकासकामांच्या नावाखाली शहरातील रस्त्यांचे वाजले तीन-तेरा
ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी शहरात भूमीगत गटर योजनेचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात येत आहे. नगर पालिकेने नुकतेच अनेक विभागात रस्ता बांधकाम केले. आता हेच रस्ते पुन्हा खोदून भूमीगत गटारासाठी पाईप टाकण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वार्डातील रस्त्याचे तीन तेरा वाजले असून, आवागमणास सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात विकास कामाच्या नावाखाली अनेक कामे सुरू आहेत. ब्रम्हपुरी शहरात भूमीगत गटर लाईन योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदाराकडून रस्त्याचे जेसीबी द्वारे खोदकाम करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेने अनेक प्रभागात रस्त्याचे बांधकाम केले. मात्र, भूमीगत गटर लाईनच्या कामासाठी आता हेच बांधकाम केलेले रस्ते पुन्हा उखळण्यात आले आहेत. त्यामुळे नगर पालिकेचा रस्ता बांधकामासाठी वापरलेला निधी वाया जाणार असून हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे उखळलेल्या रस्त्यावरून पायी चालतांना तारेवरची कसरत करीत मार्ग शोधावा लागत आहे. तर दुचाकीने रस्त्यावरून आवागमण करतांना, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गटर लाईनचे काम रस्त्यावर दिवसभर चालत असल्यामुळे अनेक वार्डात रस्ते जाम झाल्याचे दिसून येते. शहराच्या विकासाच्या नावाखाली रस्ता बांधायचा, मग उखडून टाकायचा अन् पुन्हा बांधायचा असा निरर्थक प्रकार नगर पालिका हद्दीत पहावयास मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांचा कररूपी पैसा निरर्थक वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.