ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई; १० गोवंशाची सुटका, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त!

हळदा-वांद्रा मार्गे चालणारी जनावरांची चोरटी वाहतूक पोलिसांनी रोखली; दोन आरोपींना अटक
   

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी :
          प्राण्यांना निर्दयतेने एका पिकअप वाहनात कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. २५ मार्च २०२६ च्या पहाटे डोरली फाटा येथे केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १० गोवंशाची सुटका केली असून, एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
           बुधवार, २५ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हळदा-वांद्रा मार्गे एका पिकअपमधून जनावरांची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे आणि त्यांच्या पथकाने हळदा-गांगलवाडी रोडवरील डोरली फाट्यावर सापळा रचला. सकाळी ५ वाजेच्या सुमारास हळदा कडून येणारी टाटा इन्फ्रा पिकअप (क्रमांक: MH 34 BZ 6959) थांबवून तपासणी केली असता, त्यात ७ गायी, २ कालवड आणि १ गोरा असे एकूण १० गोवंश अत्यंत निर्दयतेने, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता कोंबलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून संतोष रामराव थोरात (वय ४८, रा. शास्त्रकार ले आउट, चंद्रपूर) व एजाज असलम बॅग (वय ३६, रा. बगलखिडकी, चंद्रपूर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
          अधिक चौकशी केली असता, ही जनावरे कुलमुद माहुरे (रा. नवेगाव, ता. ब्रह्मपुरी) याने भरून दिली असून ती चंद्रपूर येथील मालक मोहसीन कुरेशी (रा. रहमतनगर) याच्याकडे नेली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पिकअप वाहन आणि जनावरे असा एकूण ७,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
           या प्रकरणी आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ३३३/२०२६ अन्वये प्राणी छळ अधिनियम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोवंशाची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी गोविंद गोशाळा, हळदा येथे सुरक्षितरीत्या करण्यात आली आहे.
       ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी दारासिंग राजपूत आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज खडसे, मुकेश गजबे, निलेश तुमसरे, वशिष्ठ रंगारी, स्वप्निल पळसपगार, अनुप दिघोरे आणि विशाल झोळे यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रतन लेनगुरे करीत आहेत.

  Post Views:   616




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी