न. प. निवडणूक : भाजपाचे सूत्रे विलास विखार यांच्याकडे!

   

ब्रह्मपुरी/ महेश पिलारे 

         ब्रह्मपुरी शहराच्या गुलाबी थंडीत नगरपालिकेचे राजकारण तापत चालले आहे. ब्रह्मपुरी नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे. मात्र ब्रह्मपुरीत भारतीय जनता पक्षात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार ठरविण्यावरून रणकंदन सुरु आहे. एकीकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नवागत माजी नगरसेवक विलास विखार यांचे नाव नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गाजत आहे. नागरिकांच्या चर्चेवरून एकंदरीत भाजपात मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह सुरू असून नवप्रवेशिताला नगराध्यक्षाची संधी मिळणार अशी चर्चा जनमानसात जोरकसपणे सुरू आहे.
     
       ब्रह्मपुरी नगरपालिका निवडणूकीचे अर्ज भरण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही ब्रह्मपुरीतील भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार कोण? हे ठरविण्यात यश आले नाही. एकीकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा निष्ठावंत भाजप कार्यकर्ता रहावा, यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यापूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलेले नवागत माजी नगरसेवक विलास विखार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी त्यांचे नाव समोर केले आहे. भाजपात सर्वगुणसंपन्न व आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एकमेव नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माजी नगरसेवक विलास विखार यांचा बोलबाला असल्याचे कळते. असे जरी असले तरी, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा निष्ठावंत भाजप कार्यकर्ता असावा तसेच नवप्रवेशित नसावा, अशा ठाम भूमिकेवर देशकर गट अडून आहेत.

         शिवाय, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांचे सुपुत्र यास स्थानिक स्वराज्य संस्थेत पाय रोवायचे असल्यामुळे देशकर गट काँग्रेसला अंतर्गत सहकार्य करीत असल्याची लोकचर्चा सुरू आहे. तसेच माजी नगरसेवक विलास विखार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरल्यास? आगामी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांचे खांद्यावर येईल, ह्या भीतीपोटी माजी आमदार प्रा. अतुल देशकर हे निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या आपल्या गटाच्या उमेदवाराला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशाही परिस्थितीत नवप्रवेशित माजी नगरसेवक विलास विखार यांच्यावर पक्षश्रेष्ठीं, महसूल मंत्री तथा आमदार महोदयांचा वरदहस्त असल्यामुळे विलासच्या हातात कमळाचे फुल उगविण्याची चर्चा चौकात चौकात ऐकावयास मिळत आहे.

       यासाठी नवप्रवेशित माजी नगरसेवक विलास विखार यांनी आपले सर्वस्व पणाला लावत पक्षश्रेष्ठींकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करीता मागणी केल्याची कळते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरीत भारतीय जनता पक्षाचा विस्तार याबाबतही पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधल्याचे बोलले जात आहे. त्यानुसारच ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्रे ही पक्षश्रेष्ठीकडून थेट माजी नगरसेवक विलास विखार यांच्याकडे जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त राजकीय जाणकारांकडून कळते. ब्रह्मपुरी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार, निवडणुकीची व्युहरचना आणि पक्षवाढी संदर्भातील भूमिका आदी. कामे माजी नगरसेवक विलास विखार यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. एकंदरीत लोक चर्चेवरून माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची पक्षवाढी संदर्भातील कारकिर्दी आता नवप्रवेशित माजी नगरसेवक विलास विखार यांच्या हातात जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  Post Views:   2393




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी