१० वीच्या निकालात हिंदू ज्ञान मंदिरचा स्वरीत चौधरी तालुक्यात प्रथम ; नेवजाबाई हितकारिणी हायस्कूलचा सम्यक मेश्राम तालुक्यात दुसरा

   

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :
        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला. 'पूर्व विदर्भाचे शिक्षणाचे माहेरघर' अशी ख्याती असलेल्या ब्रम्हपुरी नगरीने आपली ही ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरविली आहे. ब्रम्हपुरी शहरातील विविध विद्यालयांनी यशाची परंपरा कायम राखत निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. शहरातील हिंदू ज्ञान मंदिर या विद्यालयाचा विद्यार्थी स्वरीत दीपक चौधरी याने ९६.२० टक्के गुण मिळवून ब्रम्हपुरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
       गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र असलेल्या नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.नेवजाबाई हितकारिणी हायस्कूलचा विद्यार्थी सम्यक म. मेश्राम याने ९५.६० टक्के गुणांसह तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला. वेदांत राऊत याने ९४.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरे स्थान पटकाविले. नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी सिमरन मनीसागर फुलझेले हिने ९३.८० टक्के गुणांसह तालुक्यात चतुर्थ येण्याचा मान मिळवला. ब्रम्हपुरीतील या शैक्षणिक संस्थांनी केवळ उत्तम निकालच दिला नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान या निकालातून अधोरेखित झाले आहे. विशेषतः नेवजाबाई हितकारिणी संस्थेच्या दोन्ही विद्यालयांनी (हायस्कूल व कन्या विद्यालय) आपल्या शिस्तबद्ध आणि दर्जेदार अध्यापन पद्धतीचा प्रत्यय दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलताबाई भैया व सचिव अशोक भैया यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच ने. हि. हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एम. नाईक सर, ए. डब्ल्यू. नाकाडे उपमुख्याध्यापक , पी. आर. जिभकाटे पर्यवेक्षक तसेच ने. हि. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रभा बनपुरकर मॅडम, व्ही. एम. निखारे उपमुख्याध्यापक, अर्चना खंडाते पर्यवेक्षिका आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  Post Views:   430


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी