प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी 17 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ
ब्रह्मपुरी
नगरपरिषद ब्रह्मपुरी सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती सादर करण्यासाठी यापूर्वी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून प्राप्त सुधारित वेळापत्रकानुसार, आक्षेप सादर करण्याची अंतिम मुदत आता दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
त्यामुळे संबंधित प्रभागातील मतदारांनी आपली नावे प्रारूप मतदार यादीमध्ये योग्यरीत्या समाविष्ट झालेली आहेत याची खात्री करून घ्यावी. काही तक्रार, आक्षेप अथवा दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधितांनी नमुना अ किंवा नमुना ब मध्ये आपले आक्षेप नगरपरिषद कार्यालयात निश्चित मुदतीत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले कोणतेही आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच, आपले नाव कोणत्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेले आहे याबाबत चौकशी करण्यासाठी नागरिकांनी www.mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर भेट देऊन “Search Name in Voter List” या पर्यायाचा वापर करावा. मतदार आपल्या नावाने किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाने मतदार यादीत नाव शोधू शकतात. अशी माहिती ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी पत्राद्वारे दिली.