हजारोंच्या संख्येत गुरूदेव भक्तांचा शांती मोर्चा
अ.भा. संस्था मोझरी करत आहे जमीन हडपण्याचा प्रयत्न
ब्रह्मपुरी/का.प्र.
कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील जमिन हडप करून कार्याचा बिमोड करू पाहणार्यार अखिल भारतीय सेवा मंडळ संस्था गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती यांच्या विरोधात अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, अध्यक्ष नवलाजी मुळे, सेवकरामजी मिलमिले, रविदादा मानव, संतोष रडके, कृष्णा सहारे, प्रविण राऊत (केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष), कार्याध्यक्ष रेखाताई, अविनाशभाऊ आंबेकर, देवीदासजी जगनाडे, विजयराव खरवडे यांच्यासह संपूर्ण विदर्भातून ३ हजार लोकांनी उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या कार्यालयावर जाहिर मोर्चा आंदोलनाची वाटचाल केली.
मुरलीधर मंदिर, टिळक नगर, ब्रह्मपुरी येथून भजन, नारे, घोषणांच्या गजरात शांती मोर्चाची सुरूवात झाली. पोलीस स्टेशन, फवारा चौक मार्गे मोर्चा येऊन शेवटी शिवाजी चौकात सुबोधदादा, रविदादा मानव व श्री सेवकरामजी मिलमिले यांनी सभेला संबोधित केले. यावेळी सुबोधदादांनी वस्तुस्थिती बयाण केली की, ५० वर्षाआधी महाराष्ट्र शासनाने ४० एकर जागा अड्याळ टेकडीच्या नावाने दिली असून तेव्हापासून आपली निरंतर ताबा वहिवाट आहे. प्रकरण न्यायालयात सुरू असतांना तहसिलदार, ब्रह्मपुरी यांनी कोणत्या अधिकाराने ७/१२ उतार्याकवरून अड्याळ टेकडीचे नाव कमी करून अखिल भारतीय संस्था, मोझरी, अमरावती या संस्थेचे नाव चढविले. या अन्यायाच्या विरोधात अविरत आंदोलन पुकारण्यासाठी सुरूवात म्हणून हया शांती मोर्चाचे आयोजन केले आहे. प्राण जाईल तरी अड्याळ टेकडीचे सेवक लोक आपला ताबा वहिवाट सोडणार नाही. या अखिल भारतीय संस्थेने कमलापूरची आश्रमशाळा विकली, आदर्श आमगावचे ७/१२ बदलविले, २ वर्षाआधी अध्यात्म गुरुकुल मोझरीचे सुद्धा ७/१२ बदलविले होते, पंढरपूरच्या आश्रमावर सुद्धा यांनी दावे केले आहे, असे हे अखिल भारतीय संस्था गुरुकुंज मोझरीचे पदाधिकारी म्हणजे प्रत्यक्ष राक्षस असून गुरुदेव सेवामंडळाच्या कार्यावर एक अलंक अभिशाप आहे. आपण सर्वांनी आपले गुरुदेव सेवामंडळ यांच्यापासून रक्षण करून यांच्या अन्यायाविरूद्ध एकजुटीने लढलो पाहिजे, यासाठीच हा शांती मोर्चा आहे.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर अड्याळ टेकडी येथे पालकमंत्री अशोक उईके यांच्या गाडीला घेराव करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाचा अभ्यास करून कायदेशीर जे आवश्यक आहे ती कार्यवाही अवश्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ब्रह्मपुरी तालुक्याची, चंद्रपूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या अड्याळ टेकडीला अखिल भारतीय संस्थेच्या पदाधिकारी राक्षसांच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी अन्यायाच्या प्रतिकारार्थ गुरुदेव भक्तांमध्ये प्रचंड संताप असून त्याच्या उत्तरार्थात या भव्य शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.